Chief source of smuggling of Ganja in Thane arrested from Ahmednagar | ठाण्यात गांजाची तस्करी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अहमदनगर येथून अटक
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

ठळक मुद्दे पाच लाख २५ हजारांचा २० किलो गांजा हस्तगतयापूर्वी दोघांना अटकठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

ठाणे: गांजाची तस्करी केल्याप्रकरणी अहमदनगर येथून रोहिदास मोहिते (५५, रा. सिरसगाव, जि. अहमदनगर) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी दुपारी अटक केली आहे. त्याच्यासह यापूर्वी अटक केलेल्या गुरुनाथ सापळे (४२) आणि मंगेश शिवणे (४०) अशा तिघांनाही २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून २० किलोचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
कल्याणच्या गोविंदवाडी बायपास येथे एका वाहनातून मोठया प्रमाणात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस नाईक नामदेव मुंढे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार आणि उपनिरीक्षक गिरीष गायकवाड यांच्या पथकाने १० सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गोविंदवाडी बायपास येथून संशयास्पदरित्या जाणाºया एका कारला पाठलाग करुन पकडले. या वाहनाच्या तपासणीमध्ये गुरुनाथ आणि मंगेश या दोघांना पाच लाख २५ हजारांच्या २० किलो ३८२ ग्रॅम वजनाच्या गांजासह ताब्यात घेण्यात आले. त्यांनी नाशिक येथून कल्याणमध्ये हा गांजा विक्रीसाठी आणल्याची कबूली प्राथमिक चौकशीमध्ये दिली. त्यांच्याकडून कारसह १२ लाख १४ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यांना १६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. दरम्यान, त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारे अहमदनगर येथून १५ सप्टेंबर रोजी रोहिदास मोहिते यालाही या पथकाने अटक केली. त्यानेच हा गांजा या दोघांकडे विक्रीसाठी दिला होता, अशी माहिती तपासामध्ये समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.


Web Title: Chief source of smuggling of Ganja in Thane arrested from Ahmednagar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.