challenge to Niranjan Davkhare increase BJP's position in Thane | ठाण्यात भाजपची कमान चढती ठेवण्याचे निरंजन डावखरेंपुढे आव्हान

ठाण्यात भाजपची कमान चढती ठेवण्याचे निरंजन डावखरेंपुढे आव्हान

- अजित मांडके, ठाणे

ठाणे शहर भाजप अध्यक्षपदाची धुरा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ. निरंजन डावखरे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने एक स्वच्छ चेहरा म्हणूनही त्यांची निवड महत्वाची मानली जात आहे. राज्यात ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्याच पद्धतीने ठाणे महापालिकेतही महाविकास आघाडीचे सरकार येऊ शकते, अशी शक्यता आतापासून निर्माण झाली आहे. निरंजन हे राजकारणात नवीन नसेल तरी त्यांना आता शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि राष्टÑवादीचे जितेंद्र आव्हाड यांचा सामना करुन भाजपला वाढविण्यासाठी रणनिती आखावी लागणार आहे. यापूर्वी त्यांचे वडील स्वर्गीय वसंत डावखरे यांचे सर्व पक्षीयांशी चांगले संबंध असल्याने त्यांनी ठाण्यात काय किंवा राज्यात काय अनेक ठिकाणी आपले डाव खरे करुन दाखविले होते. आता तीच किमया त्यांचे पुत्र निरंजन यांनी दाखविण्याचे आव्हान या निमित्ताने त्यांच्यापुढे निर्माण झाले आहे.
कोकण पदवीधर निवडणुकीच्या आधी निरंजन डावखरे यांनी भाजपची कास धरली. त्यानंतर त्यांची लढत शिवसेना आणि राष्टÑवादीबरोबर झाली होती. परंतु या लढतीत त्यांची सरशी झाली. परंतु तेव्हांची परिस्थिती वेगळी होती आणि आता बदललेल्या परिस्थितीचा सामना निरंजन यांना करावा लागणार आहे. यापूर्वी ठाण्यासह जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व होते. शिवसेनेचे नेते स्व. आनंद दिघे यांनी भाजपच्या या वर्चस्वाला सुरंग लावत खासदाराबरोबर आमदारकी शिवसेनेकडे खेचून आणली होती. परंतु आता डोंबिवली, मुरबाड वगळता जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व फारसे कुठे दिसून आलेले नाही. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रात भाजपने सत्ता स्थापन केली आणि ते लोण महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही दिसून आले. त्यानंतर अलीकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही भाजपने पहिल्यापेक्षा जास्त जागा जिंकून एक वेगळा इतिहास रचला आहे. हे जरी खरे असले तरी आता काही राज्यांच्या सत्तेतून भाजप हद्दपार झाली. त्यामध्ये आता महाराष्टÑाचाही समावेश आहे.
दरम्यान मधल्या काळाचा विचार केल्यास २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. त्यावेळेसही भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला होता. ३५ जागा मिळवू अशा वल्गनाही भाजपच्या काही मंडळींनी केल्या होत्या. परंतु भाजपला २३ जागांवर विजय संपादन करता आला. भाजपमधील पाच जणांना यात बाजी मारता आली. उर्वरीत जे नगरसेवक निवडून आले, ते इतर पक्षाचे होते. हे भाजपला नाकारता येणार नाही. त्यामुळे ते १७ आपले आहेत का? याचा अभ्यास भाजपला आधी करावा लागणार आहे. कारण आता सत्तेची समीकरणे हळू हळू बदलू लागली आहेत. त्यामुळे यातील किती भाजपमध्ये राहतील आणि किती जण घरवापसी करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यातील इतर पक्षातून आलेल्यांवरच सध्या ठाण्यात भाजप तग धरुन आहे. निंरजन डावखरे हे सुध्दा राष्टÑवादीमधून भाजपमध्ये आलेले आहेत. परंतु आता त्यांच्या खांद्यावर शहर अध्यक्षपदाची धुरा टाकण्यात आली आहे.
येत्या काळात भाजपच्या गटनेतेपदाची जबाबदारीही इतर पक्षातून आलेल्या नगरसेवकाच्या खांद्यावर टाकण्यात येणार आहे. किंबहुना डावखरे यांच्या निकटवर्तीयांमधीलच नगरसेवकाला हा मान मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पक्षातील मंडळी नाराज झाल्याचे बोलले जात आहे. आज भाजपच्या हाती ठाणे शहराची आमदारकी आणि २३ नगरसेवकांचे पाठबळ आहे. परंतु आता शिवसेनेच्या विरोधात रणनिती आखण्याचा विडा भाजपने उचलला आहे. वास्तविक पाहता, ठाण्याचा गड हा यापूर्वी शिवसेनेकडे होता. परंतु संजय केळकर यांच्या निमित्ताने हा गड भाजपने पुन्हा आपल्याकडे खेचून आणला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या केळकर यांनी हा गड कसाबसा राखला आहे. परंतु येत्या काळात हा गड राखण्याचे मोठे कसबही निरंजन यांना दाखवावे लागणार आहे.
या शिवाय पक्षातील स्वकीयांनाही त्यांना आपलेसे करुन घ्यावे लागणार आहे. शिवाय शिवसेनेबरोबर लढत देण्यासाठी याच लोकांच्या भरवश्यावर त्यांना आगामी महापालिका निवडणुकीची रणनिती आखावी लागणार आहे. गेलेले वैभव पुन्हा मिळविण्यासाठी वेळप्रसंगी त्यांनी आपल्या वडीलांचे कौशल्यही आत्मसात करावे लागणार आहे. निरंजन हे उच्चशिक्षित आहेत, साधा स्वभाव उच्च विचार, स्वच्छ प्रतिमा अशी त्यांची ओळख आहे. मात्र राजकारणात तेवढेच असून चालत नाही, ते समोरच्याच्या खेळीवरही बारीक सारीक लक्ष ठेवून त्याच्या प्रत्येक खेळीचा पलटवार करण्याचे कसब त्यांना आत्मसात करावे लागणार आहे.
आता खरी कसोटी निरंजन यांची लागणार आहे. येत्या काळात महापालिका निवडणुकीची रणनिती ठरविण्याचे शिवधनुष्य त्यांनी हाती घेतले असले तरी त्यांना पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा सामना आधी करावा लागणार आहे. ठाण्यात शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष मानला जात आहे. शिवाय त्यांना एकनाथ शिंदे यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने आव्हाड आणि शिंदे यांच्या मैत्रीला उघड पाझर फुटला आहे.
येत्या काळात ठाण्यात ही मैत्री आणखी फुलली तर त्याचा त्रास हा भाजपलाच होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा या दोघांचा सामना कसा करायचा याचा अभ्यास निरंजन यांना करावा लागणार आहे. शिवाय सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधात खुलेपणाने भूमिका मांडावी लागणार आहे. यामुळे डावखरे यांचे कसब लागणार आहे.

वडिलांप्रमाणे इतर पक्षातील लोकांना आपलेसे करून पक्ष वाढवण्यासाठी करावे लागणार प्रयत्न
राज्यात मनसे आणि भाजप यांच्यात नव्या समीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे. तसे झाल्यास ठाण्यातही ही समीकरणे आगामी पालिका निवडणुकीत आकाराला येण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळेसही निरंजन यांना महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. त्यामुळे मनसे जवळ आली तर भाजपला आपली भुमिकाही काहीशी बदलावी लागणार आहे. एकूणच येत्या काळात निरंजन यांना आपल्या स्वाभावात बदल करतांनाच, स्वकीयांना आपलेसे करण्याबरोबरच वडीलांप्रमाणे इतर पक्षातील लोकांना आपलेसे करुन भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. एकूणच निरंजन यांच्यापुढे आता भाजपच्या माध्यमातून ‘डाव खरे’ करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यात आता ते कितपत यशस्वी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: challenge to Niranjan Davkhare increase BJP's position in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.