सीडीआर प्रकरण : आसामचा पोलीस शिपाई अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:20 AM2018-04-03T05:20:50+5:302018-04-03T05:20:50+5:30

बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात आसाम येथील एका पोलीस शिपायास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक केलेला हा दुसरा पोलीस शिपाई आहे.

CDR Case: Assam Police Attachment Attempted | सीडीआर प्रकरण : आसामचा पोलीस शिपाई अटकेत

सीडीआर प्रकरण : आसामचा पोलीस शिपाई अटकेत

Next

ठाणे - बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात आसाम येथील एका पोलीस शिपायास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक केलेला हा दुसरा पोलीस शिपाई आहे.
कुणाच्याही मोबाइल नंबरचा सीडीआर बेकायदेशीररीत्या काढून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने जानेवारी २०१८ मध्ये केला होता. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित आणि काही खासगी गुप्तहेरांसह १२ आरोपींना अटक केली. आरोपींमध्ये यवतमाळ येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस शिपाई नितीन खवडे यालाही पोलिसांनी अटक केली होती. यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयीन ई-मेलचा दुरुपयोग या प्रकरणातील एक आरोपी अजिंक्य नागरगोजे याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी त्यालाही अटक केली होती.
प्राधिकृत अधिकाºयाकडून लेखी अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने विनंती आल्यावरच संबंधित मोबाइल नंबरचा सीडीआर मोबाइल कंपनीकडून पुरवला जातो. हा धागा पकडून पोलिसांनी तपास केला असता, जवळपास १५० सीडीआर बेकायदेशीर पद्धतीने काढल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. त्यामुळे आणखी काही पोलीस अधिकाºयांच्या कार्यालयीन ई-मेलचा सीडीआर मिळवण्यासाठी दुरुपयोग केला असण्याची पोलिसांना शंका होती. त्याअनुषंगाने हे संशयास्पद १५० सीडीआर कुणाच्या ई-मेलवरून पुरविण्यात आले, याची माहिती ठाणे पोलिसांनी काढली होती. त्यानुसार, देशभरातील जवळपास १५ पोलीस आयुक्तालये आणि ग्रामीण पोलिसांची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती ठाणे पोलिसांनी सर्व संबंधितांना पाठवल्यानंतर संबंधित पोलीस खात्याने अंतर्गत चौकशी सुरू केली. अशीच चौकशी आसाम येथील दिमा असाव पोलीस अधीक्षक कार्यालयानेही केली. या चौकशीमध्ये दिमा असाव पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत येणाºया हाफलाँग येथील पोलीस शिपाई भुवनेश्वर दास याची माहिती समोर आली. त्याने बेकायदेशीररीत्या सीडीआर मिळवून ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीस पुरवल्याचे आसाम पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, भुवनेश्वर दासला २३ मार्च रोजी अटक केली. भुवनेश्वर हा तेथील सायबर सेलमध्ये नोकरीला आहे. त्याने सीडीआर मिळवण्यासाठी दिमा असाव येथील पोलीस अधीक्षकांच्या ई-मेलचा दुरुपयोग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
त्याच्याविरुद्ध गोपनीयतेचा भंग केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या टोळीतील एका आरोपीला भुवनेश्वर दासने सीडीआर पुरवल्याने आवश्यकता भासल्यास त्याला ताब्यात घेण्याची कारवाई ठाणे पोलीस करण्याची शक्यता आहे. या प्रकरणामध्ये नजीकच्या काळात काही पोलीस कर्मचाºयांची नावे समोर येण्याची शक्यता ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी काही दिवसांपूर्वीच वर्तविली होती.

आयेशाने मागितला अवधी

सीडीआर प्रकरणात अभिनेता जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ यांची भूमिका समोर आल्यानंतर, ठाणे पोलिसांनी दोन आठवड्यांपूर्वी त्यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास बजावले होते.
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयेशा श्रॉफ यांनी प्रकृतीचे कारण समोर करून पोलिसांना थोडा अवधी मागितला आहे. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर चौकशीसाठी येऊ, असे आयेशा यांनी ठाणे पोलिसांनी कळविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: CDR Case: Assam Police Attachment Attempted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.