व्यवसाय विकासासाठी ठाण्यात रंगली उद्योगाची जत्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 01:27 AM2019-11-26T01:27:03+5:302019-11-26T01:27:44+5:30

लघुउद्योजकांना आपल्या उत्पादन व सेवांचे सादरीकरण करून व्यवसाय विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी एक आगळेवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटच्यावतीने नुकतेच लक्ष्यवेध उद्योग जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.

Business development fair In Thane | व्यवसाय विकासासाठी ठाण्यात रंगली उद्योगाची जत्रा

व्यवसाय विकासासाठी ठाण्यात रंगली उद्योगाची जत्रा

googlenewsNext

मुंबई : लघुउद्योजकांना आपल्या उत्पादन व सेवांचे सादरीकरण करून व्यवसाय विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी एक आगळेवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटच्यावतीने नुकतेच लक्ष्यवेध उद्योग जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे येथील टीप टॉप प्लाझा येथे १६ ते १७ नोव्हेंबर रोजी उद्योगाची जत्रा रंगली होती. या उपक्रमासाठी प्रायोजक म्हणून जॉय ई-बाईक आणि सहाय्यक प्रायोजक म्हणून सारस्वत सहकारी बँक आणि पितांबरी उद्योगसमूहाचे आयओकेईएन यांचे सहकार्य लाभले. लोकमत वृत्तसमूह या कार्यक्रमाचे असोसिएट पार्टनर होते.

१६ नोव्हेंबर रोजी लक्ष्यवेध उद्योग जत्रा २०१९ चे उद्घाटन कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले. याप्रसंगी पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, वेल्थ गाईडचे संचालक अरुण सिंग, यूनाईट्स बिझनेस सोल्युशन्सचे संचालक संजय ढवळीकर, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे प्रमुख मार्गदर्शक अतुल गोरे आणि लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे संचालक अतुल राजोळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा सुर्वे यांनी केले.

लक्ष्यवेध उद्योग जत्रेच्या माध्यमातून सर्व पातळीच्या उद्योजकांना, प्रोफेशनल व्यक्तींना, तज्ज्ञांना, ग्राहकांना, पुरवठादारांना, बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छताखाली एक आगळेवेगळे व्यासपीठ प्राप्त झाले. लक्ष्यवेध उद्योग जत्रा २०१९ मध्ये १२० उद्योजकांनी सहभाग घेऊन आपल्या उत्पादन व सेवांचे प्रदर्शन सादर केले. खास लघुउद्योजकांसाठी बँकिंग, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, मुद्रा योजना, सौर ऊर्जा, वास्तू, शेती यांसारख्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शनपर परिसंवाद आयोजित करण्यात आले होते.

काही विशेष उत्पादन आणि सेवांचे अनावरण देखील मान्यवरांच्या हस्ते लक्ष्यवेध उद्योग जत्रेमध्ये करण्यात आले. यामध्ये जॉय ई-बाईक या ब्रँडअंतर्गत इलेक्ट्रिक सुपर बाइक आणि पितांबरी उद्योगसमूहाच्या आयओकेईएन डिजीटल सेक्युरिटी सोल्यूशनचे अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे डॉ. सुरेश हावरे लिखित ‘स्टार्ट-अप मंत्र’ या पुस्तकाच्या आवृत्तीचे प्रकाशन देखील लक्ष्यवेध उद्योग जत्रा २०१९ मध्ये करण्यात आले.

१७ नोव्हेंबर रोजी लक्ष्यवेध उद्योग जत्रा २०१९ चा सांगता समारंभ पार पडला. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून कॉर्पोरेट वकील नितीन पोतदार आणि दिवा महाराष्ट्राचा आणि गोवा पोतुर्गीजा या रेस्टॉरंट शृंखलेचे संस्थापक डॉ. सुहास अवचट उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर, सहभागी उद्योजक, उपस्थित जनसमुदाय अशा सगळ्याच स्तरातून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक झाले. लघुद्योजकांना प्रगतीपथावर आणण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महाराष्ट्राच्या विविध भागात आयोजित करण्यात यावेत अशी भावना सर्वच मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली. याशिवाय उद्योग जत्रेच्या पुढील पर्वात या उपक्रमाचा कालावधी दोन दिवसांऐवजी तीन दिवसांचा करावा, अशी मागणी बहुतांशी सहभागी उद्योजक आणि उपस्थितांकडून मोठ्या आग्रहाने करण्यात आली. दोन दिवसीय विविध क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींनी लक्ष्यवेध उद्योग जत्रेस भेट दिली. त्याचप्रमाणे उद्योजकांची ही खास जत्रा अनुभवण्यासाठी प्रचंड जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. एकूणच या दोन दिवसांत सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरणात उद्योजकांची एकजूट आणि संधीची लयलूट अनुभवण्यास मिळाली.

Web Title: Business development fair In Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.