गुजराती भाषेतील बिलं व विजदरवाढीच्या निषेधार्थ विजबिले जाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 17:05 IST2018-12-10T17:05:07+5:302018-12-10T17:05:24+5:30
रिलायन्स एनर्जी कंपनी अदानी ग्रुपने घेतल्या नंतर विजेच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आल्याने आधीच लोकां मध्ये संताप आहे.

गुजराती भाषेतील बिलं व विजदरवाढीच्या निषेधार्थ विजबिले जाळली
मीरारोड - भरमसाठ विज दरवाढ व गुजराती भाषेतुन विजबिले दिल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने आज भार्इंदर येथील अदानी एनर्जीच्या कार्यालया समोर निषेध करत विजबिले जाळली.
रिलायन्स एनर्जी कंपनी अदानी ग्रुपने घेतल्या नंतर विजेच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आल्याने आधीच लोकां मध्ये संताप आहे. त्यातच भार्इंदर मध्ये अदानीची विजबिलं गुजराती भाषेतुन दिली जात असल्याचे समोर आल्याने सोशल मिडीयावर टिकेची झोड उठली. गेल्या आठवड्यात मराठी एकीकरण समिती, जिद्दी मराठा संघटना आदींच्या पदाधिकारयांनी भार्इंदर येथील अदानी एनर्जीच्या अधिकारयांची भेट घेऊन निवेदन दिले. महाराष्ट्रात मराठी भाषेतुनच विजबिले द्यावीत अशी मागणी करत अदानी कंपनीचा निषेध केला होता.
आज सोमवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, विरोधी पक्षनेते राजु भोईर, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, नगरसेविका निलम ढवण, शर्मिला गंडोली, उपजिल्हा संघटक शंकर विरकर, प्रवक्ता शैलेष पांडे, शहरप्रमुख लक्ष्मण जंगम, राजकुमार चौरसिया आदींसह मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी भार्इंदर फाटक येथील अदानी कंपनीच्या कार्यालया बाहेर जोरदार निदर्शने केली. विजबिल कमी करा व मराठी भाषेतुनच बिले हवीत अशा घोषणा दिल्या.
सरनाईक यांच्यासह शिष्टमंडळाने अदानी कंपनीच्या अधिकारयांची भेट घेऊन निवेदन दिले व विजबिल कमी करा आणि बिले मराठी भाषेतुनच द्या अशी मागणी केली. या वेळी अधिकारयांनी व्यवस्थापना कडे दोन्ही मुद्दे मांडुन कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.