दफनविधी चार तास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:59 PM2019-07-12T23:59:11+5:302019-07-12T23:59:17+5:30

खड्डा खोदण्यासाठी कामगारांचा अभाव : वीरशैव लिंगायत समाजाची फरपट सुरूच

The burial kept for four hours | दफनविधी चार तास रखडला

दफनविधी चार तास रखडला

मुरलीधर भवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शिवमंदिर स्मशानभूमीत दफनविधीसाठी खड्डा खोदण्यासाठी गुरुवारी कामगारच नसल्याने पार्थिव रुग्णालयात चार तास रखडल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. वीरशैव लिंगायत समाजातील व्यक्तींचे दफन केले जात असल्यामुळे अशी फरपट नेहमीच वाट्याला येत आहे. तसेच अवाजवी पैशांची मागणी केली जात असल्यामुळे केडीएमसी प्रशासन याबाबत उपाययोजना करणार की नाही, असा संतप्त सवाल या समाजबांधवांनी केला आहे.
डोंबिवली औद्योगिक निवासी संकुलात राहणारे वीरशैव लिंगायत समाजातील यशवंत गुरव (६२) यांचे गुरुवारी किडनीच्या आजाराने कळवा येथील शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी ४ वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिव डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणण्याचे नातेवाइकांनी ठरवले. अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी नातेवाइकांनी स्मशानभूमी गाठली. वीरशैव लिंगायत समाजात मृतदेह समाधी अवस्थेत दफन करण्याची प्रथा आहे. मात्र, स्मशानभूमीत खड्डा खोदण्यासाठी कामगार नसल्यामुळे व्यवस्थापनाने पाथर्लीला जाण्यास सांगितले. त्यानंतर नातेवाईक पाथर्ली येथे गेले. तेथे दफनभूमीत चिखल व पाणी साचलेले होते. त्यामुळे खड्डा खोदण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली; मात्र पाच हजार रुपये जास्त असल्याने नातेवाईक पुन्हा शिवमंदिर स्मशानभूमीत आले. अंत्यसंस्कारांचा पेच निर्माण झाल्याने नातेवाइकांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी पाटील यांच्याकडे धाव घेऊ न दाद मागितली. पाटील यांनी स्मशानभूमीत जाऊ न तेथील व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता खड्डा खोदण्याचे काम खाजगी कंत्राटदाराला देण्यात आलेले आहे. त्यांच्याकडून काम योग्य प्रकारे केले जात नाही, तसेच जास्त पैशांची मागणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.
स्मशानभूमीत सर्व सुविधा मोफत असायला हव्यात. याबाबत आयुक्त आणि महापौरांकडे तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. अखेर पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर स्मशान व्यवस्थापनाने दोन कामगार उपलब्ध करून दिले. मात्र, तोपर्यंत रात्रीचे ८ वाजले होते. खड्डा खोदण्यास सुरुवात केल्यानंतर पार्थिव या स्मशानभूमीत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. तोपर्यंत मृतदेह चार तास अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत रुग्णालयात होता. अखेर, रात्री ९ वाजल्यानंतर दफनविधी पूर्ण
करण्यात आला.
स्वतंत्र स्मशानभूमी हवी
वीरशैव लिंगायत मंडळाचे कल्याण-ठाणेचे सरचिटणीस संजय गुरव यांनी सांगितले की, ‘कल्याण-डोंबिवली परिसरात वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या आठ हजारांवर आहे. कल्याणमध्ये समाजासाठी दफनभूमी नसल्याने त्यांना कल्याणहून पार्थिव डोंबिवलीत आणावे लागते. खड्डा खोदण्यासाठी अनेकदा अवाजवी पैशांची मागणी करून अडवणूक करण्यात येते. महापालिकेने वीरशैव लिंगायत समाजाला स्वतंत्र दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.’

Web Title: The burial kept for four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.