महानगरांवरील भार कमी करावा लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:55 IST2021-02-25T04:55:41+5:302021-02-25T04:55:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : गावं गिळंकृत करून शहरं फुगत चालली आहेत. खेडी ओस पडत असून, शहरे वाढत आहेत. ...

The burden on metros has to be reduced | महानगरांवरील भार कमी करावा लागेल

महानगरांवरील भार कमी करावा लागेल

लोकमत न्यूज नेटवर्क

बदलापूर : गावं गिळंकृत करून शहरं फुगत चालली आहेत. खेडी ओस पडत असून, शहरे वाढत आहेत. यामुळे भारत आणि इंडिया ही दरी वाढत असून, ती कमी करण्यासाठी महानगरांवरील भार कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विकासाची नवीन बीजे विकसित करण्याची गरज आहे. अशा सुदृढ विकासाची मुहूर्तमेढ आपण बदलापूर - अंबरनाथ अशा शहरांत रोवूया, असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या नगरपरिषद प्रशासनाचे संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी मंगळवारी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, युवाराज प्रतिष्ठान आणि साहित्य गौरव ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ''निमशहरी विभागांचे महाराष्ट्राचे व्हिजन'' या विषयावर डॉ. कुलकर्णी यांचे व्याख्यान मंगळवारी सायंकाळी साहित्य गौरव ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेडी स्वयंपूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते. आतापर्यंत आपण दोन महायुद्धे पहिली, महापूर आणि नैसर्गिक आपत्ती पाहिली, कोरोनाची महामारी पाहिली. यात सर्वांत जास्त नुकसान महानगरांमध्ये झाले आहे. कोरोनाच्या काळात आदिवासी वस्त्यांमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण नगण्य आहे. यावरून धडा घेऊन आपण आपल्या शहरांचा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. लोकसंख्येच्या आधारावर विकास आराखडा तयार करणे योग्य नाही.

राजकारण हे आपले काम नाही, राजकारण हा आपला विषय नाही, ही मानसिकता अयोग्य आहे. चांगल्या माणसांनी राजकारणात येणे गरजेचे आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले. चांगली, हुशार, अभ्यासू माणसे राजकारणात आणि प्रशासनात येणे ही काळाची गरज आहे. चांगले मुद्दे आणि चांगले विचार यावर चर्चा होणे आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण राज्याचा अभ्यास दौरा सुरू केला आहे. महानगरांवरील भार कमी करून मध्यम शहर विकसित करणे आवश्यक आहे. तोच या दौऱ्याचा हेतू आहे. अंबरनाथ आणि बदलापूरसारख्या पालिका तयार करतांना त्यामध्ये चांगल्या नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करूया. सध्या ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगचा जमाना आहे. त्याचा फायदा घेत आपल्या पालिकांचे उत्पन्न कसे वाढेल, याचा विचार करून नियोजन करणे आवश्यक आहे, असे कुलकर्णी म्हणाले.

.............

वाचली

Web Title: The burden on metros has to be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.