मीरा रोडमध्ये अतिक्रमणांवर 'बुलडोझर'; शोभायात्रेवरील दगडफेकीनंतर सरकारची 'ऑर्डर'
By धीरज परब | Updated: January 23, 2024 20:54 IST2024-01-23T20:51:53+5:302024-01-23T20:54:45+5:30
महापालिकेने पोलिसांच्या बंदोबस्तात नया नगर मधील १७ अनधिकृत दुकाने, गॅरेज, शेडवर बुलडोझर चालवला.

मीरा रोडमध्ये अतिक्रमणांवर 'बुलडोझर'; शोभायात्रेवरील दगडफेकीनंतर सरकारची 'ऑर्डर'
मीरारोड - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बुलडोझर पॅटर्न मीरारोडच्या नया नगर भागातील दंगलग्रस्त भागात राबवण्यात आला. महापालिकेने पोलिसांच्या बंदोबस्तात नया नगर मधील १७ अनधिकृत दुकाने, गॅरेज, शेडवर बुलडोझर चालवला.
मीरारोडच्या नया नगर भागात रविवारी रात्री भाईंदर मधून गेलेल्या लोकांनी तेथील धार्मिक स्थळाजवळ घोषणाबाजी केली होती. त्यावेळी जमावाने भाईंदरच्या लोकांवर हल्ला चढवला होता. त्यानंतर नया नगर भागात दोन गट आमने सामने येऊन दगडफेक झाली होती. तर शहरातील अन्य भागात देखील मारहाण, तोडफोडीच्या घटना घडल्या. दंगलीमुळे शहरात तणाव असतानाच मंगळवारी सायंकाळी मीरा भाईंदर महापालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात हैदरी चौक येथील एका इमारतीतील ८ दुकानांचे वाढीव अनधिकृत बांधकामे, तर जवळच असलेली आणखी ७ अनधिकृत दुकाने व २ शेड मधील गॅरेजवर जेसीबीने कारवाई केली.
#WATCH | Illegal structures and encroachments razed by bulldozers in the Naya Nagar area of Mira Road where Ram Mandir Pranpratishtha celebrations were stone pelted. After instructions from the Maharashtra government action is being taken by Municipal Corporation with the help of… pic.twitter.com/gx0RAhB8uH
— ANI (@ANI) January 23, 2024
सदर बांधकामे व शेड पालिकेने भुईसपाट करून टाकली. उपायुक्त मारुती गायकवाड, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत सह पालिकेचे अधिकारी - कर्मचारी यांनी सदर कारवाई केली. यावेळी पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आदींचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मीरारोडच्या नया नगर भागातील बेकायदा बांधकामांवर युपी पॅटर्न बुलडोझर#MiraRoad#encroachmentpic.twitter.com/zUjFfSm8qY
— Lokmat (@lokmat) January 23, 2024
शासनाकडूनच नया नगर भागातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्याचा आदेश आल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले. दंगेखोरांना वचक बसवण्यासाठी ही तातडीने कारवाई केली गेल्याचे सांगण्यात आले.