फसवणूक करून बिल्डर झाला परागंदा; म्हाडाच्या रहिवाशांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:34 IST2019-11-19T00:34:30+5:302019-11-19T00:34:42+5:30
बिर्ला कॉलेजसमोरील वसाहतीचा पुनर्विकास रखडला

फसवणूक करून बिल्डर झाला परागंदा; म्हाडाच्या रहिवाशांचा आरोप
कल्याण : आम्हाला वेळेत घर बांधून देण्याचे आश्वासन पटेल ग्रुप आॅफ कंपनीतील बिल्डर हसमुख पटेल यांनी दिले होते. मात्र, पटेल आपल्या साथीदारांसह आमची फसवणूक करून परागंदा झाला आहे, असा आरोप फसवणूक झालेल्या येथील म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांनी सोमवारी प्रसिद्धिमाध्यमांसमोर केला.
पटेल ग्रुप आॅफ कंपनीने पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालयासमोरील म्हाडा वसाहत २००८ मध्ये पुनर्विकासासाठी घेतली होती. त्यासाठी अन्यत्र तात्पुरते राहण्यास गेलेल्या वसाहतीमधील ४४८ चाळधारकांना महिन्याला मासिक भाडेही दिले जात होते. त्यानंतर, म्हाडाच्या चाळींचा ताबा घेऊन बिल्डरने इमारतीचे बांधकाम सुरू केले. मात्र, वेळेत ते पूर्ण झाले नाही. बिल्डरने केवळ ७० टक्केच काम केल्याचे म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच, मिळालेल्या एफएसआयच्या आधारे दुसऱ्या इमारतीमधील २७० पेक्षा जास्त सदनिका बिल्डरने विकल्या आहेत. २०१५ पर्यंत संथगतीने सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम २०१७ मध्ये थांबविण्यात आले. तसेच, आम्हाला दिले जाणारे मासिक भाडेही बंद करण्यात आल्याचे म्हाडाच्या वसाहतीतील रहिवाशांनी सांगितले.
ट्रायपार्टी अॅग्रीमेंटमध्ये दिलेल्या अटी आणि शर्तींचा नियमित व्याजाचा भरणा न केल्याने फसवणूक झालेल्या ११ जणांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात पटेल ग्रुप आॅफ कंपनीविरोधात मागील आठवड्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी हसमुखसह जिग्नेश मणियार, रितू वासनिक आणि राज रंगनाथन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
मागील १० वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत आहे. सुरुवातीला महिन्याला घरभाडे मिळत होते. मात्र, मागील अडीच ते तीन वर्षांपासून पटेल ग्रुप आॅफ कंपनीकडून घरभाडे मिळाले नाही.
— प्रवीण जुवाटकर, म्हाडा वसाहतीमधील रहिवासी