तीन कोटी रुपयांना बिल्डरला गंडविले, प्रॉपर्टी एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; ३१ सदनिकाधारकांच्या रकमेचा परस्पर अपहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:15 IST2025-11-10T14:15:04+5:302025-11-10T14:15:47+5:30
Fraud News: एका प्राॅपर्टी एजंटने प्रतीक साळवी (३५) या बांधकाम व्यावसायिकाची तीन काेटी १८ लाखांची फसवणूक केली. त्याने ३१ सदनिकाधारकांच्या रकमेचा परस्पर अपहार केल्याने याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाैपाडा पाेलिसांनी रविवारी दिली.

तीन कोटी रुपयांना बिल्डरला गंडविले, प्रॉपर्टी एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; ३१ सदनिकाधारकांच्या रकमेचा परस्पर अपहार
ठाणे - एका प्राॅपर्टी एजंटने प्रतीक साळवी (३५) या बांधकाम व्यावसायिकाची तीन काेटी १८ लाखांची फसवणूक केली. त्याने ३१ सदनिकाधारकांच्या रकमेचा परस्पर अपहार केल्याने याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाैपाडा पाेलिसांनी रविवारी दिली.
साळवी यांच्या ‘अटलांटा प्राॅपर्टीज’ आणि ‘अटलांटा ग्रुप’ अशा दाेन बांधकाम भागीदारी फर्म आहेत. या दाेन्ही फर्मचे ठाण्यातील वागळे इस्टेट याठिकाणी कार्यालय आहे. अटलांटा प्राॅपर्टीज या फर्ममध्ये प्रतीक यांच्यासह त्यांचे वडील प्रमाेद, पृथ्वीराज संघवी, पक्षल संघवी आणि पुष्पराज राठाेड असे पाच भागीदार आहेत. तसेच अटलांटा ग्रुपमध्ये प्रतीक आणि प्रमाेद या पितापुत्रांसह दिव्येश पाटील, साेहम काटे, स्वराज सरवणकर आणि हेमंत बावधनकर असे सहा भागीदार आहेत.
जानेवारी २०१८ ते २०२४ दरम्यान अटलांटा प्राॅपर्टीज फर्मने भांडुप येथे इमारत संघवी अटलांटा व अटलांटा ग्रुपने मुलुंड येथे बांधलेली ‘मल्हार गाईड’ या दाेन्ही इमारतीमधील ८४ सदनिका विक्रीतील रकमा या फर्मच्या दाेन्ही मूळ बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी फर्मतर्फे प्राॅपर्टी एजंट माेझम शेख यांच्याकडे साेपविली हाेती.
बनावट सह्या करून आराेपीने रचला कट
सदनिका खरेदीदारांना दिल्या जाणाऱ्या पावत्यांचे पावती बुक हे साळवी यांच्या कार्यालयातील दिनेश काटके आणि अर्चना गुप्ता या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात हाेते. शेख याने त्यांच्याशी संगनमत करून, सदनिका खरेदीदारांकडून रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना दिलेल्या पावत्यांवर काेणीतरी प्रतीक यांच्या बनावट सह्या करून त्या पावत्या सदनिका खरेदीदारांना दिल्या.
शेख याने काटके आणि गुप्ता यांच्याशी संगनमताने तीन काेटी १८ लाखांच्या रकमेचा अपहार केला. त्यामुळे प्राॅपर्टी एजंट शेख याच्यासह काटके आणि गुप्ता या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, श्रीनगर पाेलिस तपास करत आहेत.
फर्मच्या नावाचा गैरवापर : शेख याने बांधकाम व्यावसायिक कंपन्यांचा विश्वासघात करून दाेन्ही बांधकाम प्रकल्पातील ३६ सदनिका विक्री व्यवहारातील फ्लॅट खरेदीदारांकडून आलेले तीन काेटी १८ लाख रुपये दाेन्ही फर्मच्या मूळ बँक खात्यावर जमा करण्याऐवजी शेख याने अटलांटा प्राॅपर्टीज आणि अटलांटा ग्रुप या फर्मच्या नावाचा गैरवापर करून अन्य बँकांमधील खात्यांमध्ये जमा केल्या. त्या पैशांचा स्वत:च्या फायद्यासाठी अपहारही केला.