पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:16 IST2025-09-03T19:15:39+5:302025-09-03T19:16:17+5:30
कासारवडवलीतील एका बांधकामासाठी खाेदलेल्या शेतातील खदाणीतील पाण्यात एका ३५ वर्षीय महिलेसह तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
ठाणे: कासारवडवलीतील एका बांधकामासाठी खाेदलेल्या शेतातील खदाणीतील पाण्यात एका ३५ वर्षीय महिलेसह तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास उघड झाला. महिलेने मुलीसह उडी घेत आत्महत्या केली की या दाेघींचाही काेणी खून केला? अशा दाेन्ही शक्यता वर्तविण्यात येत असून त्यांची ओळखही पटविण्यात येत असल्याची माहिती कासारवडवली पेालिसांनी बुधवारी दिली.
कासारवडवलीतील विहंग व्हॅली, लंबर काॅलनी भागातील द इन्फिनिटी प्रोजेक्ट जवळील आशिष पाटील यांच्या मालकीच्या शेतजमिनीतील अडीच फूट खाेल खड्डयातील पाण्यात या महिलेसह मुलीचा अशा दाेघींचे मृतदेह तरंगतांना मंगळवारी आढळले. ही माहिती मिळताच घटनास्थळी कासारवडवली पाेलिसांसह अग्निशमन दलाचे पथकही दाखल झाले. या जवांनानी हे दाेन्ही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून ते कासारवडवली पाेलिसांच्या ताब्यात दिले. हे दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्यांच्या नातेवाईकांचाही शाेध घेण्यात येत आहे. हा घातपात आहे की आत्महत्या याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पेालीस िनरीक्षक निवृत्ती काेल्हटकर यांनी दिली.