The body of a newborn infant found in a drain in Thane | ठाण्यातील नाल्यात मिळाला नवजात अर्भकाचा मृतदेह
वर्तकनगर येथील घटना

ठळक मुद्दे वर्तकनगर येथील घटनानाला सफाईच्या वेळी मिळालेल्या बॅगेत होते अर्भक अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह काढला बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वर्तकनगर येथील सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिरच्या बाजूला असलेल्या नाल्यात नवजात अर्भकाचा मृतदेह सोमवारी दुपारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
पोखरण रोड क्रमांक-१ वरील रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या या नाल्यामध्ये ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नाल्यातील कचरा काढणा-या एका सफाई कामगाराला एक बॅग मिळाली. त्या बॅगेत हे मृत अर्भक मिळाले. हे अर्भक पाहून घाबरलेल्या या सफाई कामगाराने तिथून पळ काढला. दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी वर्तकनगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिल्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह नाल्याच्या बाहेर काढण्यात आला. घरगुती वादातून किंवा अनैतिक संबंधातून एखाद्या महिलेने किंवा पुरुषाने नुकत्याच जन्मलेल्या मुलीचा खून केल्यानंतर तिला या नाल्यात फेकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी कलम ३१८ नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
--------------------

Web Title:  The body of a newborn infant found in a drain in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.