आसनगाव : सुमारे १६४६ मीटर उंच असलेल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाईची चढाई करणे म्हणजे गिर्यारोहकांची कसोटी लागते. परंतु, याच उंचीला गवसणी घालणाऱ्या रोहिदास टोचे या जन्मापासून अंध असलेल्या युवकाच्या जिद्दीचे कौतुक साऱ्या नाशिक व ठाणे जिल्ह्यात सुरू आहेइगतपुरी तालुक्यातील भरवीर (खु) या गावातील पांडुरंग टोचे या शेतकऱ्याच्या तीन अपत्यांपैकी एक असलेला रोहिदास हा जन्मापासून अंध आहे. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही त्याने जिद्दीने बिटको महाविद्यालयामधून एम.ए.ची पदवी घेतली. पदवीनंतर तो नाशिकमध्येच युनायटेड बँक आॅफ इंडियामध्ये सहायक व्यवस्थापकपदावर काम करत आहे.कळसूबाई शिखरावर कळसूबाईदेवीचे पुरातन मंदिर आहे. नेहमीच भाविकांची गर्दी होत असलेल्या या देवीचे दर्शन घेण्याची व शिखर चढण्याची त्याची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. घरच्या मंडळींनी त्याच्या इच्छेखातर कळसूबाई सर करण्यासाठी त्याला सहकार्य केले. वडील, भाऊ, बहीण तसेच शहापूर तालुक्यातील भ्रमंती ग्रुपचे अध्यक्ष किशोर शेळवले, माजी आमदार दौलत दरोडा व त्यांचे सहकारी असा लवाजमा घेऊन रोहिदासने तीन तासांत महाकठीण असलेले कळसूबाई शिखर सर करून आपल्या अंधत्वावर मात केली. या धाडसाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (वार्ताहर)
अंध रोहिदासची ‘कळसूबाई’वर चढाई
By admin | Updated: October 14, 2016 06:22 IST