भाजपाचे नरेंद्र मेहता मतचोरी आणि गैरप्रकार करून निवडून आले - मुझफ्फर हुसेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 15:01 IST2025-10-18T14:58:59+5:302025-10-18T15:01:52+5:30
मतचोरी आणि गैरप्रकार करून भाजपाचे नरेंद्र मेहता निवडून आल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी केला आहे.

भाजपाचे नरेंद्र मेहता मतचोरी आणि गैरप्रकार करून निवडून आले - मुझफ्फर हुसेन
मीरारोड - भाजपाच्या माजी महापौर आणि आ. मेहतांच्या भावजयसह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी हे अनेक वर्ष १४६ ओवळा माजिवडा दुसऱ्या मतदारसंघात राहतात व तिकडे पण मतदार यादीत त्यांची नावे आहेत. मात्र १४५ मीरा भाईंदर विधानसभेच्या मतदार यादी आणि पुरवणी यादीत असंख्य नावे निवडणूक आयोग आणि बीएलओ यांच्या संगनमताने नोंदवली. मतचोरी आणि गैरप्रकार करून भाजपाचे नरेंद्र मेहता निवडून आल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी केला आहे.
भाजपच्या माजी महापौर आणि आ. नरेंद्र मेहतांच्या सख्ख्या भावजय डिम्पल विनोद मेहता मीरारोडच्या जुन्या गोल्डन नेस्ट जवळ अनेक वर्षांपासून कुटुंबासह राहतात जो ओवळा माजिवडा विधानसभा १४६ मध्ये येतो. तेथे मतदार यादी क्र. १२० अनु क्र. ४१२ वर त्यांचे नाव आहे. २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीत त्या राहत असलेल्या १४६ विधानसभामधील पालिका प्रभाग १२ मधून निवडून आल्या होत्या.
डिम्पल यांचे १४५ मीरा भाईंदर मतदारसंघाच्या यादीत पण नाव आहे. विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी ते राहत असलेल्या १४६ मतदार संघात मतदान केले नाही तर त्यांचे दीर भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता निवडणूक लढवत असलेल्या १४५ मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात मतदान केले. भाईंदर पूर्वेच्या खारीगाव येथील मां भारती हायस्कुल,रूम नंबर ३ मध्ये मतदान केले आहे. डिम्पल यांचे पती आणि आ. मेहतांचे सख्खे भाऊ विनोद यांचे नाव पण १४५ विधानसभा यादीत आहे.
या शिवाय मेहता समर्थक भाजपचे माजी नगरसेवक संजय थेराडे व पत्नी वनिता हे १४६ मतदार संघात अनेक वर्ष कुटुंबासह राहतात आणि संजय हे २०१७ साली तिकडूनच नगरसेवक झाले असताना गेल्या विधानसभा निवडणुकीच्या यादीत थेराडे दाम्पत्याचे नाव १४५ मीरा भाईंदर मतदार संघात नोंदवले गेले. धक्कादायक बाब म्हणजे त्यातील घरचा पत्ता ४ थ्या मजल्याचा असला तरी त्या नावाची इमारत नाही आणि नावाचे साधर्म्य असलेली इमारत ही ३ मजली आहे.
आ. मेहता यांचे समर्थक माजी नगरसेविका कुसुम गुप्ता व पती संतोष गुप्ता, रविकांत उपाध्याय व पत्नी शीतल उपाध्याय. आ. मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीचे संचालक असलेले संजय सखाराम सुर्वे आदी १४६ मतदार संघात राहतात व त्या मतदार यादीत त्यांची नावे असताना त्यांची नावे मीरा भाईंदर १४५ विधानसभा मतदार संघात पण नोंदवली गेली आहेत.
एकूणच मेहता व त्यांच्या नातलग, निकटवर्तीयांनी विधानसभा निवडणुकीत गैरमार्गाने निवडून येण्यासाठी ते राहत असलेल्या १४६ विधानसभा मतदार संघात त्यांची नांवे असल्याची पूर्ण कल्पना असताना देखील गुन्हेगारी प्रवृत्तीने संगनमताने कटकारस्थान करून १४५ मतदार संघात मतदान केले. दुबार मतदार नावे बाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार करूनही त्यांनी कारवाई केली नाही. भाजप च्या लोकप्रतिनिधीनी लोकप्रतिनिधीत्व कायद्याचा भंग केला असून निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून वोट चोरी व भ्रष्ट गैरप्रकार केला आहे. माजी महापौर, माजी नगरसेवक सारख्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या जबाबदार राजकीय लोकांनी दोन्ही मतदार संघात नावे नोंदवून लोकप्रतिनिधीत्व कायद्याचा भंग केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी ह्या बाबत माहिती देताना माजी आमदार व काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी केली.
दरम्यान आ. मेहतांनी माध्यमांशी बोलताना मुझफ्फर यांचे आरोप खोटे असल्याचे सांगितले. डिम्पल लग्नाआधी तिकडे राहत होत्या मात्र त्यांचे नाव तिकडे राहिले माहिती नाही. त्यांना निवडणूक आयोग कडून ऑनलाईन स्लिप मिळाली व त्या नुसार त्यांनी तिकडे मतदान केले. त्यांनी दोन वेळा मतदान केले नाही. मी ६४ हजार मतांनी जिंकलोय ६०० मतांनी नाही. मतदार यादीत दुबार नावे हि निवडणूक याद्यांमधील तांत्रिक चुका आहेत असे ते म्हणाले.