अभियंता दिनी भाजपची गांधीगिरी, रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 15:44 IST2021-09-15T15:44:00+5:302021-09-15T15:44:30+5:30
ठाण्यातील घोडबंदर रोडसह इतर रस्ते खड्ड्यांनी गिळंकृत केले आहेत. वाहनचालकांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, वाहनकोंडीसह अपघातांचे प्रमाणही कमालिचे वाढले आहे.

अभियंता दिनी भाजपची गांधीगिरी, रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचे आवाहन
- विशाल हळदे
ठाणे - ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बुधवारी अभियंता दिन साजरा होत असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी पद्धतीने येथील अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांना गुलाबाचे फूल देऊन अभियंता दिन साजरा करण्यापेक्षा रस्त्यावर पडलेले खड्डे अगोदर भरून लोकांचे प्राण वाचवण्याचे आवाहन केले.
ठाण्यातील घोडबंदर रोडसह इतर रस्ते खड्ड्यांनी गिळंकृत केले आहेत. वाहनचालकांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, वाहनकोंडीसह अपघातांचे प्रमाणही कमालिचे वाढले आहे. भाजपने या मुद्यावर वेळोवेळी आंदोलन करूनही रस्त्यांची परिस्थिती जैसे थे आहे. खड्ड्यांमुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. ही परिस्थिती बदलल्यास खऱ्या अर्थाने अभियंता दिन साजरा होईल, असा सल्ला देत खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे प्राण जात आहेत, याला जवाबदार कोण, असा सवाल कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
एकीकडे अभियंता दिन उत्साहात साजरा होत असला तरी, जिल्ह्यात दोनच दिवसांपूर्वी एका लाचखोर शाखा अभियंत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या, याचे स्मरण करून देत या परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.