भाजपला हव्यात शिंदेसेनेच्या जागा; ठाण्यातील 'मध्यवर्ती' भागांवर भाजपची करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:26 IST2025-12-20T13:25:45+5:302025-12-20T13:26:26+5:30
भाजपने शिंदेसेनेकडे ठाण्यातील ५० जागांची मागणी केली असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.

भाजपला हव्यात शिंदेसेनेच्या जागा; ठाण्यातील 'मध्यवर्ती' भागांवर भाजपची करडी नजर
ठाणे : भाजपने शिंदेसेनेकडे ठाण्यातील ५० जागांची मागणी केली असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. शिंदेसेनेच्या काही विद्यमान जागांवर भाजपने दावा केला. काही जागांवरून घासाघीस सुरू असल्याचे चित्र या युतीच्या शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या बैठकीत दिसून आले. जागा वाटपाचा फॉर्म्युला २२ डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल, असे दोन्ही पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले.
शुक्रवारी युतीची तब्बल तीन तास चर्चा झाली. या बैठकीला शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे, पूर्वेश सरनाईक, हणमंत जगदाळे व भाजपकडून आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे आदी उपस्थित होते. या चर्चेत काही जागांवर एकमत झाले असले, तरी काही जागांवरून घासाघीस सुरू आहे. भाजपने ठाण्यातील मध्यवर्ती भागासह वागळे, वर्तकनगर, लोकमान्य नगर आदींसह इतर काही जागांवर दावा केला. तसेच शिंदेसेनेच्या काही विद्यमान जागा मिळाव्यात, अशी भाजपची अपेक्षा आहे.
भाजपकडे २४ माजी नगरसेवक असले, तरी भाजपने ५० जागा मिळाव्यात, अशी मागणी केली. शिंदेसेनेने एवढ्या जागा देण्यास इन्कार केला. शिंदेसेनेकडे सद्यःस्थितीत ७९ माजी नगरसेवकांचे बळ आहे. यावर तोडगा काढला जाईल, असे दोन्ही पक्षांतील नेते सांगत आहेत.
"बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. युती पक्की असून, लवकरच युतीच्या जागा वाटपाची घोषणा केली जाईल." - नरेश म्हस्के, खासदार, शिंदेसेना, ठाणे
"काही जागांवर घासाघीस सुरू आहे. वरिष्ठ निर्णय घेतील. जागा वाटपाची घोषणा २२ डिसेंबर रोजी केली जाईल." - आ. निरंजन डावखरे, निवडणूक प्रभारी