अंबरनाथ : शिंदेसेनेचे माजी आ. रवींद्र फाटक यांनी गुढीपाडव्यानिमित्त अंबरनाथमधील नगरसेवकांना पाठवलेल्या गुढ्या भाजपच्या नगरसेवकांनी परत केल्या. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शिंदेसेनेने भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागातील विषयांना विरोध करत ते रद्द केले होते. त्याचा निषेध म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली. फाटक यांनी पाठवलेल्या गुढ्या आणि शुभेच्छा पत्र साभार परत लिहिलेल्या बॉक्समध्ये भरण्यात आली.भाजपच्या अंबरनाथ शहर कार्यालयात रविवारी पत्रकार परिषद झाली. त्यास भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, गटनेते अभिजित करंजुले, ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शिंदेंसेनेने सभागृहात घेतलेल्या भूमिकेचा भाजपने निषेध केला.
शिंदेसेना आज घेणार पत्रकार परिषद आम्ही आमची भूमिका पत्रकार परिषद घेऊन सोमवारी मांडणार आहोत. आमच्या पक्षाचे नेतेच भाजपला योग्य उत्तर देतील, अशी भूमिका शिंदेसेनेचे गटनेते रवींद्र करंजुले यांनी मांडली.
आमदार, खासदार ‘टार्गेट’ भाजपने आता शिंदेसेनेच्या भूमिकेनंतर त्यांचे आमदार आणि खासदार यांनादेखील ‘टार्गेट’ करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे अंबरनाथमधील सत्तासंघर्षात शहरातील विकासकामे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.