भाजपा पदाधिका-याची भाईंदर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक उपनिरीक्षकास दमदाटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 18:33 IST2020-05-28T18:32:51+5:302020-05-28T18:33:16+5:30
पोलीस सहाय्यक उपनिरीक्षकास भाजपाच्या पदाधिका-याने दमदाटी केल्याचा प्रकार गुरुवारी घडला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात डायरी नोंद करण्यात आली

भाजपा पदाधिका-याची भाईंदर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक उपनिरीक्षकास दमदाटी
मीरा रोड - कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दुचाकीवरून गस्त घालत बाहेर जमलेल्या लोकांना घरी जा म्हणून सांगणा-या भाईंदरच्या पोलीस सहाय्यक उपनिरीक्षकास भाजपाच्या पदाधिका-याने दमदाटी केल्याचा प्रकार गुरुवारी घडला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात डायरी नोंद करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाने 20 बळी घेतले असून, 577 जणांना लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पोलीस देखील गस्त घालून लोकांना बाहेर गर्दी करू नका म्हणून सांगत आहेत. आज गुरुवारी भाईंदरच्या देवचंद नगर परिसरात भाईंदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक ए . के . पाटील हे दुचाकीवरून गस्त घालत होते. त्या ठिकाणी काही लोकं रस्त्यावर जमलेली व गप्पा गोष्टी करताना दिसली म्हणुन लोकांना थांबू नका, घरी जा असे त्यांनी सांगितले.
परंतु त्या ठिकाणी असलेले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भरत कोठारी मात्र तेथेच थांबले. पोलिसाने सांगून देखील कोठारी गेले नाहीच, उलट दमदाटी सुरू केली. बघून घेईन, तुझी बातमी छापायला सांगेन अशी धमकी दिली. सदर प्रकाराची भाईंदर पोलीस ठाण्यात डायरी नोंद करण्यात आली आहे. तर या प्रकरणी मनसे, शिवसेना, काँग्रेस सह काही संस्थांनी निषेध व्यक्त करत भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी केली आहे. तर वरिष्ठ निरीक्षक आल्या नंतर गुन्हा दाखल करण्या बाबत निर्णय घेतील असे पोलीस सूत्रांनी सांगीतले.