ठाणे : अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी बदलापूरच्या बारवी डॅम रोड परिसरात ठाणे गुन्हे शाखा आणि बदलापूर पोलिसांनी संयुक्तरीत्या केली. या कारवाईत देशी बनावटीची दोन पिस्तुले, काडतूस जप्त करण्यात आले.
भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी शरद म्हात्रे, हरेश भोपी, दशरथ कांबरी अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी असलेल्या शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार झाला होता. मात्र, आता म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडेच अवैध शस्त्रे सापडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांनी पिस्तूल कशासाठी बाळगली होती, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.