शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 06:50 IST2025-11-07T06:49:36+5:302025-11-07T06:50:11+5:30
'७० पार'चा दिला होता नारा, संघर्ष आणखी तीव्र होणार

शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मागील काही महिन्यापासून शिंदेसेनेच्या नेत्यांना अंगावर घेणारे भाजपचे आ. संजय केळकर यांच्याच खांद्यावर पक्षाने ठाणे निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवल्याने भाजपने आक्रमक पवित्रा कायम राखण्याचे व पर्यायाने महायुती न करण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे.
ठाण्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीपेक्षा शिंदेसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष दिसतोय. वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार सुरू करून शिंदेसेनेला शह दिला. नाईक हे एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना दिसतात. सेवा पंधरवडा बैठक असो किंवा भाजप पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर, सगळीकडे त्यांनी ठामपाच्या मागील सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
संघर्ष आणखी तीव्र होणार
वर्तकनगर येथे झालेल्या भाजप बैठकी नाईक म्हणाले होते की, नवी मुंबईत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही देऊ शकतो; पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल, तुम्ही तयार आहात का? या विधानावर शिंदे सेनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्त देताना रावण खलनायक ठरला कारण त्याने दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण केले. नाईकांनी हे विधान स्वतःबद्दलच केले, अशी टीका त्यांनी केली होती. परंतु आता भाजपने नाईक यांच्याच खांद्यावर जिल्हा निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे आता संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.
शिबिरात स्वबळाचा नारा
भाजप आ. केळकर यांनी अलीकडेच झालेल्या भाजप शिबिरात 'अबकी बार ७० पार' अशी घोषणा देत स्वबळाचा नारा दिला. आरोग्य मंदिर, नालेसफाई, कंत्राटी कामगार यांसारख्या विविध विषयांवरून ते शिंदे सेनेवर सतत टीका करीत आहेत. भाजपकडून आता केळकर यांच्याकडे ठाणे शहर निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली.