मोहाच्या वाईनची विक्री करण्यास परवानगी द्यावी; भाजप आमदार किसन कथोरेंची उपरोधिक मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 21:19 IST2022-01-31T21:18:43+5:302022-01-31T21:19:30+5:30
सुपरमार्केटमध्ये वाईनची विक्री करण्याला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यापासून या निर्णयावर मोठी टीका होत आहे.

मोहाच्या वाईनची विक्री करण्यास परवानगी द्यावी; भाजप आमदार किसन कथोरेंची उपरोधिक मागणी
बदलापूर : राज्यात सुपरमार्केटमध्ये वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता याच निर्णयावरून भाजप आमदार किसन कथोरे यांनी मोहाच्या फुलांच्या वाईनची विक्री करायला सुद्धा परवानगी द्यावी, अशी उपरोधिक मागणी सरकारकडे केली आहे.
सुपरमार्केटमध्ये वाईनची विक्री करण्याला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यापासून या निर्णयावर मोठी टीका होत आहे. हाच धागा पकडून भाजपचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना एक पत्र लिहिले आहे. यात वाईनची विक्री केल्याने सरकारचा महसूल वाढून राज्याचा विकास होईल, अशी उपरोधिक टीका करण्यात आली. सोबतच आता आदिवासी बांधवांना मोहाच्या फुलाची वाईन तयार करून विकण्यास परवानगी द्यावी, जेणेकडून आदिवासींचा आर्थिक स्तर उंचावून त्यांचाही विकास होईल, अशी उपरोधिक मागणी करण्यात आली आहे. वाईन विक्रीच्या निर्णयामुळे तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळण्याची भीतीही कथोरे यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. आमदार कथोरे यांनी केलेल्या उपरोधिक मागणीमुळे त्यांचे पत्र मतदार संघात चांगलेच चर्चेला आले आहे.
सरकार त्यांच्या निर्णयावर ठाम असेल तर मग माझ्या पत्राचा देखील त्यानी विचार करावा. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्या पत्राच्या अनुषंगाने निर्णय घेण्याची धमक दाखवावी. तरुणांना व्यसनाकडे वळण्याचा सरकारचा हा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे. - किसन कथोरे, भाजप आमदार, मुरबाड विधानसभा