भाजप शोधतेय शिवसेनेला जोरदार टक्कर देणारा दबंग गटनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 01:12 IST2021-02-14T01:12:19+5:302021-02-14T01:12:37+5:30
Thane : सध्या शिवसेनेने शून्य भाजप मोहीम हाती घेऊन भाजपची एकही जागा निवडून येता कामा नये यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळेच शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपनेदेखील कंबर कसली आहे.

भाजप शोधतेय शिवसेनेला जोरदार टक्कर देणारा दबंग गटनेता
ठाणे : येत्या वर्षभरावर ठाणे महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत एकट्याने लढणारा भाजप आता यासाठी कामाला लागला आहे. यानुसार आगामी वर्षभरासाठी शिवसेनेला टक्कर देणारा गटनेत्याचा शोध भाजपच्या श्रेष्ठींनी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये अनेकांची नावे पुढे येत असली तरी जो शिवसेनेच्या कारभाराची पोलखोल करेल, अशा नगरसेवकाच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ घातली जाणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
सध्या शिवसेनेने शून्य भाजप मोहीम हाती घेऊन भाजपची एकही जागा निवडून येता कामा नये यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळेच शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपनेदेखील कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचा गटनेता बदलण्याबरोबर स्थायी समितीमध्ये तगडे सदस्य पाठविण्याची तयारी भाजपने केली आहे. सध्या भाजपचे गटनेते संजय वाघुले आहेत. परंतु, त्यांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी काहींनी आतापासूनच गुडघ्याला बांशिंग बांधले आहे. या पदासाठी नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्यासह नारायण पवार, अशोक राऊळ, मनोहर डुंबरे यांची नावे आघाडीवर आहेत. परंतु, भाजप कोणावर विश्वास टाकणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. नारायण पवार यांना यापूर्वी संधी दिलेली आहे, तर अशोक राऊळ हे पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक असले तरी ते शिवसेनेला कडवी झुंज देतील का? हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता मनोहर डुंबरे आणि मिलिंद पाटणकर यांच्या नावांची चर्चा जोर धरू लागली आहे.
मार्च महिन्यात स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणीदेखील भाजपकडून तगडे सदस्य पाठविण्याची तयारी आहे. भाजपचे स्थायी समितीत अवघे तीन सदस्य आहेत, तर १३ सदस्य हे महाविकास आघाडीचे आहेत.
भारदस्त नावांचा शोध
सर्वांना टक्कर देण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेच्या चुकीच्या कामांची पोलखोल करण्यासाठी तीन भारदस्त नावे शोधली जात असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. आता कुणाच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ पडते याकडे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे लक्ष लागले आहे.