ठाणे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा; जनता दरबारापूर्वी भाजपने व्यक्त केली इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 08:38 IST2025-02-23T08:38:24+5:302025-02-23T08:38:34+5:30
जनता दरबारावरून शिंदे सेनेचे पवार यांनी आगपाखड केली.

ठाणे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा; जनता दरबारापूर्वी भाजपने व्यक्त केली इच्छा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापालिका निवडणुकामध्ये युती करायची का नाही याबाबत आमचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील. मात्र ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, अशी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याची भावना आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हेच स्पष्ट केले आहे, असा निर्धार भाजपने पुन्हा एकदा व्यक्त केला.
स्वबळावर सत्तेकरिता भाजप सक्रिय असल्याचे माजी खा. संजीव नाईक यांनी स्पष्ट केले. मंत्री गणेश नाईक यांच्या सोमवारी होणाऱ्या जनता दरबारवरून शिंदेसेना आक्रमक झाली.
ठाण्यातील तिन्ही मंत्री जोमात!
ठाण्यातील खारकर आळी येथे नाईक यांचा जनता दरबार होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजीव नाईक यांनी शनिवारी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे विविध अधिकाऱ्याशी संवाद साधत तयारीचा आढावा घेतला.
ठाणे जिल्ह्यात तीन मंत्री असून तिघेही जोमाने काम करीत आहेत. आम्ही तिन्ही पक्ष मिळून लोकांचे प्रश्न सोडवत आहोत. ठाण्यातील दहा वर्षांनंतर पुन्हा जनता दरबाराचा अनुभव घेत आहे.
अनधिकृत बांधकामासंदर्भात नागरिकांना आपले म्हणणे मांडता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदेसेनेकडून आगपाखड
जनता दरबारावरून शिंदे सेनेचे पवार यांनी आगपाखड केली. नाईक हे ज्येष्ठ नेते आहेत. परंतु ते हे विसरले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे जनता आहे. शिंदे जेथे उभे राहतात, जेथे त्यांची गाडी थांबते तेथे त्यांचा जनता दरबार सुरू होतो. आनंद दिघे यांनी दरबार भरवण्याची प्रथा चालू केली आणि ती आजपर्यंत सुरू आहे. नाईक येथे जनता दरबार घेत आहेत. मग भाजपचे तीन वेळा निवडून आलेले आ. संजय केळकर जनतेची कामे करत नाहीत का, असा सवाल पवार यांनी केला.