भाजपच्या नगसेवकांची कामेच होत नाहीत, खासदार-आमदारांसह भाजपा नगरसेवकांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 21:36 IST2017-09-08T21:35:21+5:302017-09-08T21:36:15+5:30
शिवसेनेपाठोपाठ भाजपच्या शिष्ट मंडळाने केडीएमसीचे आयुक्त पी.वेलारसू यांची भेट घेत कामेच होत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. खासदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट शुक्रवारी संध्याकाळी वेलारसू यांच्या दालनात घेण्यात आली.

भाजपच्या नगसेवकांची कामेच होत नाहीत, खासदार-आमदारांसह भाजपा नगरसेवकांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट
डोंबिवली, दि. ८ - शिवसेनेपाठोपाठ भाजपच्या शिष्ट मंडळाने केडीएमसीचे आयुक्त पी.वेलारसू यांची भेट घेत कामेच होत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. खासदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट शुक्रवारी संध्याकाळी वेलारसू यांच्या दालनात घेण्यात आली. त्यावेळी पाटील यांच्यासह आमदार गणपत गायकवाड, आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर मोरेश्वर भोईर गटनेते वरुण पाटील यांच्यासह नगरसेवकांनी भेट घेत नाराजी व्यक्त केली. महापालिका हद्दीत विकास कामांचा बटयाबोळ झालेला असून निधीच मिळत नसल्याने नागरिकांना सुख-सुविधा कशा द्यायच्या असा सवालही त्यांनी केला. प्रशासन केवळ शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची काम करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. सत्तेत भाजप देखिल असून केवळ सेनेच्या लोकप्रतिनिधींची काम का केली जातात असा सवाल करत भाजपच्या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात भोईर म्हणाले की, सातत्याने २७ गावांमधील पाण्याच्या समस्येसह अन्य समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. या महापालिका हद्दीतील बहुतांशी प्रकल्प हे अर्धवट आहेत. त्यामुळे ते पूर्ण करण्यावर भर द्यावा पण त्या दृष्टीने कामे होतच नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहेत. कोणकोणती कामे गेल्या महिन्यातील ज्या फाइली मंजूर झाल्यात कोट्यवधींच्या कामांबाबत यादी द्यावी. शहर अभियंता ती यादी देत नाही हे योग्य नाही. का देत नाहीत तर त्यावरुन सेनेच्या नगरसेवकांची कामे केली हे स्पष्ट होइल ही त्यांना भिती आहे का असा सवालही भोईर यांनी केला. २७ गावांमध्ये पाणीप्रश्न तीव्र होणार असून त्याचा फटका बसल्यानंतर कार्यवाही करण्यापेक्षा आताच उपाययोजना कराव्यात असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या अन्य नगरसेवकांनीही गा-हाणे मांडत आयुक्त बदलून फायदा काय झाला असा सवाल करत सपशेल नाराजी व्यक्त केली. आयुक्त वेलारसू यांनीही आगामी काळात सगळयांची समसमान काम होतील. जे प्रकल्प सुरु आहेत त्यांचा आढावा घेऊन त्यांचेही काम प्रगतीपथावर नेण्यात येइल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.