भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने हल्ला; शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 08:23 IST2025-11-28T08:22:37+5:302025-11-28T08:23:10+5:30
पालिका निवडणुकीचा मतदानाचा दिवस जवळ येत असताना हाणामाऱ्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने हल्ला; शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यावर आरोप
अंबरनाथ - अंबरनाथ पालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाचमधील भाजप उमेदवार प्रजेश तेलंगे यांच्या भावावर बुधवारी रात्री कोयत्याने हल्ला झाला. शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याने प्रचार वादातून हा हल्ला केल्याचा आरोप जखमी सत्यम तेलंगे याने केला आहे. त्यामुळे शिंदेसेना, भाजपमधील संघर्ष वाढला आहे.
या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पालिका निवडणुकीचा मतदानाचा दिवस जवळ येत असताना हाणामाऱ्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
‘जाणिवपूर्वक केला अडकवण्याचा प्रयत्न’
हल्ला करणारा शिंदेसेनेचा उमेदवार शैलेश भोईर यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप सत्यमने केला आहे. साहिल याला मी ओळखत नाही. या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसून जाणीवपूर्वक खोटे आरोप करत मला अडकवले जात असल्याचे शैलेश भोईर यांनी सांगितले. या प्रकरणात अंबरनाथ पोलिसांनी साहिल वडनेरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.