BJP attacks 'CAA' opposition | ‘सीएए’ विरोधकांवर भाजपचा हल्ला

‘सीएए’ विरोधकांवर भाजपचा हल्ला

मीरा रोड : एनआरसी, सीएए आणि एनपीआरच्या विरोधात चौकसभा घेणाऱ्या कम्युनिस्ट पक्ष आणि अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करून सभा उधळून लावली. यावेळी मारहाण आणि शिवीगाळ करून गाडीची काचही फोडण्यात आली असून, भार्इंदर पोलीस ठाण्यात भाजपच्या तीन कार्यकर्त्यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भार्इंदर पश्चिमेस रेल्वे स्थानकाजवळील जय अंबेनगर झोपडपट्टी क्र. १ येथे रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी अ‍ॅड. किशोर सामंत, अताऊल्ला खान, अलोक गुप्ता, मोईन अन्सारी, श्रीनिवास सामंत आणि अन्य तीन कार्यकर्त्यांनी एनआरसी, सीएए व एनपीआर विरोधात जनजागृतीपर चौकसभा सुरू असतानाच भाजपचे कार्यकर्ते असलेले हे या परिसरातच राहणारे गुड्डु वर्मा आणि सुड्डू वर्मा हे भाऊ आणि त्यांचा एक साथीदार आला.

त्यांनी चौकसभा बंद करा असे दरडावत शिवीगाळ, दमदाटी केली. अ‍ॅड. सामंत यांनी त्यांना विरोध केला असता त्यांच्या कपाळावर ठोसा मारला. श्रीनिवास यालाही धक्काबुक्की केली. तसेच अताउल्ला यांच्या गाडीची मागची काच यावेळी फोडली.

हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी : गुड्डूवर यापूर्वीही गुन्हे दाखल असून हे सर्व भाजपचे कार्यकर्ते आहेत. पोलिसांनी अद्याप कोणाला ताब्यात घेतलेले नसून आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी अ‍ॅड. किशोर सामंत, प्रभाकर शेट्टी यांनी केली आहे.

Web Title: BJP attacks 'CAA' opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.