भिवंडी महापालिकेचा ऑक्सिजन जनरेशन प्लांटची उभारणी कागदावरच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 16:50 IST2021-07-27T16:49:59+5:302021-07-27T16:50:25+5:30
Oxygen Generation Plant : देशात व राज्यात कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाच्या दुसऱ्या लाटेत लाखो रुग्णांना लागण झाली. या परिस्थितीत महाराष्ट्र राज्यासह ठाणे जिल्हा व भिवंडी शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा नाहक बळी जात होते.

भिवंडी महापालिकेचा ऑक्सिजन जनरेशन प्लांटची उभारणी कागदावरच!
- नितिन पंडीत
भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमतरतेमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा सामना करताना राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी सक्षम असाव्यात या उद्देशाने कोट्यवधी रुपयांचा निधी शासन देत असताना भिवंडी महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आज पर्यंत निधी असूनही ऑक्सिजन जनरेशन प्लँट उभे करू शकले नसल्याने पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य अरुण राऊत यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना लेखी तक्रारद्वारे केला आहे.
देशात व राज्यात कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाच्या दुसऱ्या लाटेत लाखो रुग्णांना लागण झाली. या परिस्थितीत महाराष्ट्र राज्यासह ठाणे जिल्हा व भिवंडी शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा नाहक बळी जात होते. ऑक्सिजन अभावी रुग्णाना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने सदर रुग्णाच्या प्रकृती खालावत जात असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत गेल्याचे स्पष्ट झाले होते. अशा परिस्थितीत ऑक्सिजन अभावी एक ही रुग्णांचा मृत्यू होऊ नये या करीता शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना ऑक्सिजन स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार भिवंडी महापालिकेला ऑक्सिजन जनरेशन प्लांटसाठी राज्य शासनाकडून तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी २९ एप्रिल रोजी पालिके कडे हस्तांतरीत झाला आहे.
निधी प्राप्त झाल्यानंतर मनपा आयुक्तांनी खुदाबक्ष कोविड सेंटर त्या सोबत वऱ्हाळ देवी मंगल कार्यालय, प्रेमाताई पाटील हॉल या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यास मान्यता दिली. खुदाबक्ष हॉल या ठिकाणी ९६० आईएमपी ५६.६ सीयू. एम प्रती तास चे ऑक्सिजन जनरेशन प्लँट उभारणी साठी एक कोटी ५६ लाख ८० हजार रुपयांचा ठेका मे. टेक्नामेटे इंटरप्रायझेस या कंपनीस दिला. परंतु आज पर्यंत फक्त त्या ठिकाणी काँक्रीट जोता बनवून ठेवला असून त्यावर प्लॅट उभा करून देण्याची मुदत ४५ दिवसांची होती.
ही मुदत संपून गेली असतानाही पालिका प्रशासनाने या बाबत कोणतेही गांभीर्य बाळगले नसल्याने भविष्यात कोरोनाची तिसरी लाट उसळल्यास त्याचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन तयारीत नसल्याने त्याचा फटका पुन्हा एकदा शहरवासीयांना बसू शकतो. अशी भीती भिवंडी मनपाचे स्थायी समिती सदस्य अरुण राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सदरचा ऑक्सिजन जनरेशन प्लांट लवकरात लवकर कार्यान्वित करावा अशी मागणी केली आहे .