Bhiwandi Congress candidate will be on Saturday | भिवंडीतील काँग्रेसचा उमेदवार शनिवारी ठरणार
भिवंडीतील काँग्रेसचा उमेदवार शनिवारी ठरणार

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी - भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचा निर्णय २२ अथवा २३ मार्च रोजी दिल्लीत होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. उमेदवारी मिळावी याकरिता इच्छुक असलेल्या काँग्रेसजनांच्या दिल्लीवाऱ्या सुरु असून शिवसेनेतील नेते सुरेश उर्फ बाळ््यामामा म्हात्रे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी देण्याची चर्चा सुरु आहे.

जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाकडून पक्षश्रेष्ठींना सादर झालेल्या नावांमध्ये माजी खासदार सुरेश टावरे, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील व अल्पसंख्यांक उमेदवार म्हणून प्रदीप रांका यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. टावरे हे दीर्घकाळ काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत तर कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांनी मागील निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. प्रदीप रांका हे ३२ वर्षापासून काँग्रेसमध्ये कार्यत असून गेल्या काही वर्षापासून महापालिकेच्या राजकारणात ते सक्रिय आहेत.

मात्र भाजपाचे विद्यमान खा. कपिल पाटील यांच्या सारख्या बलाढ्य उमेदवारासमोर टक्कर देणारा उमेदवार असावा म्हणून जिल्हा परिषदेतील बांधकाम समितीचे सभापती सुरेश (बाळ््यामामा) म्हात्रे यांचे नांव काँग्रेसमधील एका गटाकडून पुढे करण्यात आले आहे. म्हात्रे हे शिवसेनेचे पदाधिकारी असून त्यांनी विद्यमान खा. पाटील यांना खुलेआम आव्हान दिले आहे. त्यामुळे कदाचित काँग्रेस त्यांना शिवसेनेतून पक्षात प्रवेश देण्याची शक्यता आहे. म्हात्रे हेही सध्या दिल्ली दौऱ्यावर असून हा दौरा व्यावसायिक कारणास्तव असल्याचा त्यांचा दावा आहे.


Web Title:  Bhiwandi Congress candidate will be on Saturday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.