Bhivandi mishap : Actual death number is different | भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यांत तफावत

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यांत तफावत

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : शहरातील धामणकरनाका परिसरातील इमारत दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यांत तफावत आढळली आहे. पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ४१ रहिवाशांचा बळी गेला असून, पोलिसांनी मात्र आतापर्यंत ३८ मृतदेहांचाच पंचनामा केल्याचे सांगितले आहे.


पटेल कम्पाउंड येथील तीन मजली जिलानी इमारत सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोसळली होती. या दुर्घटनेतील काही मृतांची नावे, आडनावे आणि मृतांच्या आकडेवारीतही तफावत दिसून आली. बुधवारी सायंकाळी ४१ मृतांची माहिती बचावकार्यासह मनपा प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने मृतदेहांचा पंचनामा व इतर बाबी तपासल्यानंतर आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्याला सरळसरळ पंचनाम्याचा आधार आहे. मात्र, बचाव पथकाने बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना ४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती.

दुसरीकडे, बचाव पथकाने शोधमोहीम राबवण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे आभार मानताना पालिका प्रशासनाने दिलेल्या पत्रामध्ये ४० जणांच्या मृत्यूचा उल्लेख केला आहे. भिवंडी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी या दुर्घटनेत ३८ जणांचा मृत्यू आणि २५ जण जखमी झाल्याची माहिती गुरुवारी दिली. मात्र, वेगवेगळ्या यंत्रणांकडून येत असलेल्या वेगवेगळ्या आकड्यांबाबत ते काही बोलू शकले नाहीत. गुरुवारी चौथ्या दिवशी, सकाळी ११ वाजता मृतदेहांची शोधमोहीम बचाव पथकाने थांबविली. त्यानंतर एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, श्वान पथक व बचाव पथकातील इतरांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.


८० तासांची शोधमोहीम
तीन मजली जिलानी इमारत सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोसळली. त्यानंतर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी लगेचच बचावकार्य सुरु करण्यात आले होते. जवळपास ८० तासांपासून सुरू असलेली शोधमोहीम गुरुवारी सकाळी ११ वाजता थांबवण्यात आली.

Web Title: Bhivandi mishap : Actual death number is different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.