भातसा धरण समोर, तरीही घशाला कोरड, पाण्यासाठी वणवण; शहापूर तालुक्यातील गावपाड्यांची स्थिती
By अजित मांडके | Updated: May 16, 2025 03:09 IST2025-05-16T03:07:25+5:302025-05-16T03:09:25+5:30
धरण नजरेसमोर आहे. त्यातही बॅकवॉटर अगदी डोळ्यांना दिसत असतानाही शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.

भातसा धरण समोर, तरीही घशाला कोरड, पाण्यासाठी वणवण; शहापूर तालुक्यातील गावपाड्यांची स्थिती
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे:धरण नजरेसमोर आहे. त्यातही बॅकवॉटर अगदी डोळ्यांना दिसत असतानाही शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. गावपाड्यांतील विहिरी आटल्याने रोज येणाऱ्या एका टँकरची गावकरी चातकासारखी वाट पाहत असतात. टँकरचे पाणी पिण्यायोग्य नसून, त्यालाही दुर्गंधी येत आहे. त्यामुळे रहिवाशांना आरोग्य समस्या भेडसावत आहेत. गावात एकच बोअरवेल. एका कुटुंबाला दोन दिवसांतून एकदा दोन हंडे पाणी मिळते. प्रत्येक घराबाहेर नळ बसवले आहेत. परंतु, त्याला एक थेंबही पाणी येत नसल्याने रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
शहापूर तालुक्यात भातसा धरण आहे. त्याच्या आजूबाजूला जळके वाडी, पोकळ्याची वाडी, कोठारे, साकडबाव, पाचरवाडी, पारदवाडी, बाबरे वाडी, चिल्हारवाडी, जांभुळवाडी, आदींसह इतर गावपाडे आहेत. या गावपाड्यांत सुमारे १० हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. प्रत्येक गावात पाण्याच्या टाक्या आहेत. घराबाहेर नळही जोडले आहेत. येथील टाक्यांमधून जिल्ह्याबाहेरील बाहुली धरणातील पाणी दिले जाणार आहे. डोळ्यासमोर असलेल्या धरणातून पाणी देण्याऐवजी जिल्ह्याबाहेरील धरणातून पाणी कशासाठी, असा सवाल रहिवासी करीत आहेत.
घराजवळ नळ असला तरी टाकीत पाणी नसल्याने नळाला पाणी नाही. पाण्याच्या टाक्यांमध्ये विहिरीत जे टँकरद्वारे पाणी टाकले जाते, तेच पाणी रहिवासी उचलून पाण्याच्या टाकीत नेऊन टाकत असल्याचे चित्र आहे.
विहिरी कोरड्या
येथील प्रत्येक गावात विहिरी आहेत. परंतु, त्या फेब्रुवारीपासूनच कोरड्या पडल्या. प्रत्येक गावात रोज एक टँकर फिरविला जातो. सकाळी सहा वाजता टँकरद्वारे विहिरीत पाणी टाकले जाते. त्यानंतर दिवसभर ते पाणी भरण्यासाठी रहिवाशांची धडपड सुरू असते. परंतु, पाण्याला दुर्गंधी येत आहे.
आरोग्याचा प्रश्न
टँकरच्या पाण्याला दुर्गंधी येत असली तरी दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने तेच पाणी रहिवाशांना प्यावे लागत असल्याने आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्या आहेत. जुलाब, पोटाच्या तक्रारी, त्वचेचे आजार, आदी आजारांना तोंड द्यावे लागत आहे. महिलांचा अख्खा दिवस पाणी भरण्यात जातो. घरापासून विहिरी दूरवर असल्याने एका वेळेत डोक्यावर दोन-दोन हंडे घेऊन महिला आणतात.
बोअरवेल आहे, पण...
चिल्हारवाडी परिसराची लोकसंख्या १२०० हून अधिक आहे. रहिवाशांसाठी गावच्या वेशीवर १९८० मध्ये खोदलेल्या बोअरवेलला पाणी आहे. परंतु, दोन दिवसांतून एकदा दोन हंडे पिण्याचे पाणी रहिवाशांना मिळते. त्यासाठी घरातील रिकामे हंडे ठेवून नंबर लावला जातो. जसा नंबर येईल तसे पाणी घेऊन जाणारी महिला दुसऱ्या घरातील महिलेला पाणी भरण्याचा निरोप देते.
पाण्यासाठी अख्खा दिवस
भातसा धरण नजरेसमोर आहे. मात्र, त्यातील पाणी आम्हाला नुसते बघावे लागते. पाण्यासाठी महिलांचा अख्खा दिवस वाया जातो. असे साकडबाव येथील रहिवासी लक्ष्मण चौधरी म्हणतात. तर गावात बोअरवेल आहे, परंतु दोन दिवसांतून एकदा केवळ दोन हंडेच पाणी मिळते, अशी खंत विनोद वाघ यांनी व्यक्त केली.