मातीच्या मूर्तीला भक्तांची पसंती- नरेशकुमार कुंभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 03:20 AM2018-09-09T03:20:21+5:302018-09-09T03:20:37+5:30

राज्य सरकारने थर्माकोलवर बंदी आणल्याने नागरिकांचा कल पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे.

Bhaikta's choice for the idol of the soil - Nareshkumar Kumbhar | मातीच्या मूर्तीला भक्तांची पसंती- नरेशकुमार कुंभार

मातीच्या मूर्तीला भक्तांची पसंती- नरेशकुमार कुंभार

Next

- जान्हवी मोर्ये 
डोंबिवली : राज्य सरकारने थर्माकोलवर बंदी आणल्याने नागरिकांचा कल पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी मातीच्या मूर्तींना भक्तांची पसंती आहे. त्यामुळे मूर्तिकारांनीही यंदा लाल मातीच्या मूर्ती घडवल्या आहेत.
गणेशमूर्तिकार सेवा संस्थेचे सचिव नरेशकुमार कुंभार म्हणाले, मूर्ती बनवण्याचा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. मागील ४२ वर्षांपासून आम्ही पीओपीपेक्षा शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवत आहोत. मूर्ती तयार करताना पर्यावरण जपण्यावर भर असतो. यंदा प्रथमच आम्ही लाल मातीची मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती घरच्या घरी कुंडीतही विसर्जित करता येऊ शकते. या मूर्तीला गणेशभक्तांकडून मोठी मागणी आहे. यंदा प्रायोगिक तत्त्वावर ४० मूर्ती तयार केल्या आहेत. पुढील वर्षी त्या मोठ्या प्रमाणावर बनवल्या जातील. मूर्तीसाठी लाल माती कर्नाटकातून आणली. त्यामुळे उत्पादन खर्च वाढल्याने भक्तांनाही थोडी अधिक किंमत मोजावी लागत आहे.
कुंभार यांच्याकडे एक ते चार फुटांपर्यंतच्या मूर्ती उपलब्ध आहेत. शाडू मातीच्या मूर्ती बाराशेपासून ते चार हजार रुपयांपर्यंत, लाल मातीच्या मूर्ती बाराशेपासून पुढे उपलब्ध आहेत. लाल मातीच्या मूर्ती शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा १०० ते १५० रुपयांनी महाग आहेत. या मूर्ती बनवण्यासाठी अधिक वेळ लागतो. दिवसभरात मातीची एखादी मूर्ती तयार होते. जीएसटी आणि इंधनदरवाढीमुळे यंदा मूर्तीच्या किमतीत वाढ झाली आहे. कागदी मखरे उंच व मोठ्या आकारात मिळत नसल्याने लहान मूर्ती घेण्याकडे भक्तांचा कल आहे.
दरम्यान, जुना पत्रीपूल वाहतुकीसाठी बंद केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे पूर्वेतील भक्तांना पश्चिमेतील कुंभारपाड्यात येता येत नाही. परिणामी मूर्तींची विक्री झालेली नाही. त्यामुळे मूर्तिकारांचे नुकसान झाल्याचे कुंभार म्हणाले.
>गणेशमूर्ती विक्रीचे परमिट असावे
यासंदर्भात आमच्या संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र महासंघ कुंभार समाज यांनी रामदास कदम यांना भेटून एक निवेदन दिले आहे. मूर्तिकार सेवा संघटनेचे पत्र असल्याशिवाय मूर्तिकारांना विक्रीचे परमिट देऊ नये, अशी मागणी महासंघ करणार आहे. महापालिका नियमावली तयार करणार नसेल, तर महापालिकेने मूर्तिकारांचे पालनपोषण करावे, असा पवित्रा कुंभार यांनी घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात मूर्तीविक्रीसाठी अनेक दुकाने थाटली जातात. त्यांच्यावर निर्बंध आणण्याची गरज आहे. हे विक्रेते मूर्ती अव्वाच्या सव्वा भावाने विकतात. मूर्तीविक्रेत्यांसाठी महापालिकेने नियमावली बनवण्याची गरज आहे.

Web Title: Bhaikta's choice for the idol of the soil - Nareshkumar Kumbhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.