अनधिकृत बांधकाम झाल्यास बीट मुकादम, मार्शल गोत्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 10:28 IST2025-10-22T10:28:42+5:302025-10-22T10:28:56+5:30
उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर प्रशासनाने मोहीम हाती घेतली

अनधिकृत बांधकाम झाल्यास बीट मुकादम, मार्शल गोत्यात
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार बीट मुकादम आणि बीट मार्शल यांच्यावर अनधिकृत बांधकामाची जबाबदारी निश्चित करण्यात आली. अनधिकृत बांधकामांची माहिती नोंद वहीत रजिस्टर केल्यानंतर त्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करणे अपेक्षित आहे; मात्र कारवाई झाली नाही, तर त्या बीट मुकादम आणि मार्शल यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला. सहायक आयुक्तांवरील जबाबदारी या निमित्ताने निश्चित करण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर प्रशासनाने मोहीम हाती घेतली असतानाच, काही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला.
बांधकामांची रोज नोंद हवी
न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत २६४ बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतलेल्या बैठकीत सर्व प्रभागांतील बीट मुकादम आणि सहायक आयुक्तांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. प्रत्येक बीट मुकादमाने आपल्या हद्दीतील बांधकामांची रोज नोंद करावी; बांधकाम असल्यास तपशील लिहावा आणि नसल्यास ‘निरंक’ असा उल्लेख करावा, असे आदेश देण्यात आले.
अनधिकृत बांधकाम आढळल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई केली जाईल. पाडकामाचा खर्च करुन तो बांधकामधारकाकडून वसूल करु.- उमेश बिरारी, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, ठाणे पालिका