एक हजारांच्या खंडणीसाठी आईस्क्रीम विक्रेत्यासह दाेघांना मारहाण; हातगाडीवरही पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
By जितेंद्र कालेकर | Updated: August 31, 2023 19:09 IST2023-08-31T19:08:32+5:302023-08-31T19:09:25+5:30
युवराज चौधरी याचा हिरानंदानी मेडोज परिसरात हातगाडीवर आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय आहे.

एक हजारांच्या खंडणीसाठी आईस्क्रीम विक्रेत्यासह दाेघांना मारहाण; हातगाडीवरही पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
ठाणे : महिन्याला एक हजारांच्या हाप्त्याची खंडणी मागितल्यानंतर ती देण्यास नकार देणाऱ्या युवराज चौधरी (२८, रा. पोखरण रोड क्रमांक दोन, वर्तकनगर, ठाणे) या आईस्क्रीम विक्रेत्यासह त्याच्या कामगाराला दाेघांनी मारहाण केली. तसेच त्याची हातगाडीही पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी करण मिश्रा आणि अर्जून मिश्रा या दाेघांना अटक केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी गुरुवारी दिली.
युवराज चौधरी याचा हिरानंदानी मेडोज परिसरात हातगाडीवर आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय आहे. २९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास करण आणि अर्जून या दाेघांनीही महिन्याचा हाप्ता म्हणून युवराजकडे एक हजारांच्या खंडणीची मागणी केली. ती देण्यास त्याने नकार दिल्याने युवराज आणि त्याचा कामगार शिवम शर्मा यांना करण आणि अर्जून या दाेघांनी मारहाण केली. तसेच आईस्क्रीमच्या गाडीवरील सामानही फेकून देत नुकसान केले. इतक्यावरच न थांबता आईस्क्रीमच्या हातगाडीवर पेट्रोल टाकून आग लावून त्या गाडीचेही काही प्रमाणात नुकसान केले. याप्रकरणी चौधरी याने ३० ऑगस्ट रोजी खंडणी आणि मारहाणीची तक्रार चितळसर पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अजय गंगावणे यांच्या पथकाने अजय आणि करण या दोघांनाही ३१ ऑगस्ट रोजी अटक केली.