भाजपच्या नागरसेविकेने आयुक्तांवर फेकल्या बांगड्या; केडीएमसीतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 19:13 IST2019-02-20T19:11:53+5:302019-02-20T19:13:45+5:30
या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत हा धक्कादायक प्रकार घडला.

भाजपच्या नागरसेविकेने आयुक्तांवर फेकल्या बांगड्या; केडीएमसीतील प्रकार
कल्याण - अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने संतप्त भाजप नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यावर बांगड्या फेकल्या आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत हा धक्कादायक प्रकार घडला.
प्रमिला चौधरी यांनी त्यांच्या प्रभागात होत असणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत त्यांनी नगररचना विभागाकडे सतत तक्रार केली होती. मात्र, २ वर्षे सतत पाठपुरावा करूनही नगररचना विभाग आपल्या तक्रारींवर कारवाई न करत असल्याने आजच्या महासभेत त्यांनी याप्रकरणी सभा तहकुबी मांडली होती. त्यावर तासभर चर्चा होऊनही आयुक्त याप्रकरणी कोणतीही ठोस भूमिका जाहीर करत नसल्याचे सांगत भाजप नगरसेविका चौधरी संतप्त झाल्या. त्यांनी आपली जागा सोडून थेट नगररचना अधिकाऱ्यांसमोर जात आपल्या हातातील बांगड्या त्यांच्यासमोर टेबलावर आदळल्या. यानंतर थेट महापालिका आयुक्तांच्या टेबलसमोर येऊन त्यांनी हातातून आणखी बांगड्या काढल्या आणि पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यावर भिरकावल्या. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला आणि पिठासीन अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केली.