मेट्रोच्या कामासाठी बांगलादेशी कामगारांचा भरणा, लोकमतच्या पाहणीत ठेकेदारानेच सांगितले सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 11:14 IST2025-01-20T11:14:00+5:302025-01-20T11:14:23+5:30

Thane News: ठाण्यातील मेट्राे तसेच इतर बांधकामांच्या ठिकाणी बहुसंख्य बांगलादेशी मजुरांचा समावेश असल्याची धक्कादायक माहितीच ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे. या मजुरांना काम देणाऱ्या एका ठेकेदारानेच ही माहिती उघड केली.

Bangladeshi workers hired for metro work, contractor reveals truth in Lokmat investigation | मेट्रोच्या कामासाठी बांगलादेशी कामगारांचा भरणा, लोकमतच्या पाहणीत ठेकेदारानेच सांगितले सत्य

मेट्रोच्या कामासाठी बांगलादेशी कामगारांचा भरणा, लोकमतच्या पाहणीत ठेकेदारानेच सांगितले सत्य

ठाणे - ठाण्यातील मेट्राे तसेच इतर बांधकामांच्या ठिकाणी बहुसंख्य बांगलादेशी मजुरांचा समावेश असल्याची धक्कादायक माहितीच ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे. या मजुरांना काम देणाऱ्या एका ठेकेदारानेच ही माहिती उघड केली. त्याला मनीसल इस्लाम या मजूर ठेकेदारानेही दुजाेरा दिला.
हिरानंदानी इस्टेटजवळील मेट्राेच्या कामाच्या मजूर काॅलनीतील मनीसल हा गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात असेच काही मजूर पुरविण्याचे काम करताे. त्याच्याकडे सध्या ३० मजूर आहेत. ताे स्वत:ही पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातून दाेन वर्षांपूर्वी आल्याचे त्याने सांगितले. मेट्राेच्या कामासाठी ४०० पेक्षा अधिक मजूर या ठिकाणी आहेत. त्यातील किमान निम्मे बांगलादेशीय असल्याचे याच भागातील मजूर सांगतात.

मनीसल याच्याकडे मेट्राेच्या स्लॅब, लाेखंडी सळया बसविण्याचे काम आहे. उत्तरप्रदेश, बिहार आणि आसाममधील मजुरांचाही समावेश आहे. अनेकांनी साेयीसाठी भारतीय आधार कार्डही बनवून घेतले आहे. सैफअली खानवरील हल्लेखाेर माेहम्मद शरीफुल शहजाद याची माहिती मिळाल्यानंतर हिरानंदानी इस्टेट भागातील मेट्राेच्या कामासाठी असलेल्या मजुरांच्या काॅलनीत मुंबई पाेलिसांनी शनिवारी रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत काेंबिंग ऑपरेशन राबविले. १० संशयित बांगलादेशींना ताब्यातही घेतले. मात्र, त्यांतील सहाजणांची कागदपत्रे याेग्य असल्याचे कासारवडवली पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. इतरांची पडताळणी सुरू असल्याचेही ते म्हणाले. 

१०० घरे २५० कामगार
या काॅलनीतील अनेकांना हल्लेखाेराबाबत काही माहितीच नसल्याचा दावा त्यांनी केला. रवींद्र वर्मा, सुभाष विश्वकर्मा हे यूपीतील मजूरही गेल्या काही महिन्यांपासून येथे काम करतात. साधारणत: १०० घरांमध्ये २५० पेक्षा अधिक मजूर आहेत. रविवारी पहाटेपर्यंत पाेलिसांनी प्रत्येकाची चाैकशी केल्याचे रामराज यादव या मजुराने सांगितले.  

हल्लेखाेरही होता मजूर 
शहजाद हा अलीकडेच ठाण्यात आला हाेता. ताे मेट्राेच्याच मजुरांमध्ये कामही करीत हाेता, अशी माहिती एका स्थानिकाने दिली. त्याआधी तो घाेडबंदर राेडवरील ब्लाबर ऑल दे या हाॅटेलमध्येही काम करीत हाेता. हाॅटेलचे सरव्यवस्थापक नेल्सन सलदाना म्हणाले, शहजाद ऊर्फ विजाेय दास हा याच हॉटेलमध्ये कामाला होता.  सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत त्याने काम केले. कामगार पुरवणाऱ्या कंपनीने विजोय असे नाव सांगणाऱ्या या कामगाराला पाठविले हाेते. आधार कार्डवरही  तेच नाव होते. ताे आला  तेव्हा त्याचा व्यवहार चांगला होता. कोणाशी त्याने  भांडणही केले नाही, असे सलदाना यांनी सांगितले.  

Web Title: Bangladeshi workers hired for metro work, contractor reveals truth in Lokmat investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.