शिंदेसेनेच्या कोंडीसाठी बदलापूर ‘पॅटर्न’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:53 IST2025-10-14T15:53:27+5:302025-10-14T15:53:57+5:30
अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांत शिंदेसेनेच्या नगरसेवकांची संख्या जास्त होती. आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्यादेखील याच पक्षांमध्ये जास्त आहे.

शिंदेसेनेच्या कोंडीसाठी बदलापूर ‘पॅटर्न’
बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांत शिंदेसेनेची ताकद आणि माजी लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविणे इच्छुकांना अवघड जाणार आहे. त्यातच आता भाजप आणि अजित पवार गटाने शिंदेसेनेला एकटे पाडत त्यांच्या अडचणीत वाढ केली आहे. अगोदर उल्हासनगरात शिंदेसेनेने भाजपला एकटे पाडले. त्याचा वचपा शेजारील या दोन्ही शहरांत भाजपने काढल्याची चर्चा आहे.
अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांत शिंदेसेनेच्या नगरसेवकांची संख्या जास्त होती. आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्यादेखील याच पक्षांमध्ये जास्त आहे. शिंदेसेनेचा विजय रथ रोखण्यासाठी महायुतीचेच घटक पक्ष या प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसोबतच महायुतीच्या घटक पक्षांसोबत लढण्याची वेळ शिंदेसेनेवर येणार आहे.
बदलापुरात भाजप, राष्ट्रवादी एकत्रित लढणार
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपसोबत अजित पवार गट युती करणार असून, त्यांची ही युती शिंदेसेनेच्या अडचणी वाढवणारी ठरणार आहे. बदलापुरात भाजप आणि शिंदे यांच्यात लढत होणार होती. मात्र, आता भाजपसोबत अजित पवार गट जोडला गेल्यामुळे भाजपचे पारडे जड झाले आहे.
अंबरनाथमध्ये
भाजप-राष्ट्रवादी एकत्र
अंबरनाथ नगरपालिकेतदेखील भाजपने अजित पवार गटासोबत निवडणूक लढण्याचा निर्णय
घेतला आहे.
याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येणार असून, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला नगराध्यक्षासाठी संधी देण्याची शक्यता आहे.
शिंदेसेनेची जमवाजमव
भाजप आणि अजित पवार गट एकत्रित आल्यामुळे आता शिंदेसेना ॲक्शन मोडवर आली असून, त्यांनी विजयी उमेदवारांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातच बंडखोरी होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
शिंदेसेनेतील गटबाजी
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेत गटबाजी असल्याचा फटका अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत पक्षाला बसण्याची भीती आहे. गटबाजीतून दगाफटका होणार नाही, याची काळजी शिंदेसेनेकडून घेतली जात आहे.
वर्षभरापासून शाब्दिक वाद
आ. किसन कथोरे व शिंदेसेनेचे वामन म्हात्रे यांच्यात जाहीर शाब्दिक चकमक सुरू आहे. अगदी अलीकडे टीका करताना वैयक्तिक आरोप केले गेले. या पार्श्वभूमीवर भाजप-अजित पवार गट एकत्र आले आहेत.