सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 06:00 IST2025-11-28T05:58:33+5:302025-11-28T06:00:27+5:30
नगरपालिका प्रभाग क्रमांक १ मध्ये अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या पैशांनी भरलेली पाकिटे वाटत असल्याचा आरोप करीत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले

सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
बदलापूर - बदलापुरात शिंदेसेना आणि अजित पवार गटामध्ये जुंपल्याचे समोर आले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान महिला कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप केला. त्यानंतर शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे जोरदार राडाही झाला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
नगरपालिका प्रभाग क्रमांक १ मध्ये अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या पैशांनी भरलेली पाकिटे वाटत असल्याचा आरोप करीत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले. यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर या ठिकाणी काही काळ शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे जोरदार राडाही झाला.
शांतीनगर भागात अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या पैसे वाटप करीत असल्याची माहिती शिंदेसैनिकांना मिळाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी या महिलांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अजित पवार गटाचे उमेदवार प्रभाकर पाटील आणि शिंदेसेनेचे उमेदवार तुकाराम म्हात्रे यांच्यात बाचाबाचीही झाली. पाकिटांमध्ये तीन-तीन हजार रुपये भरण्यात आल्याचे सांगण्यात येते.