बदलापूर बदलापूरच्या बारवी नदीत बुडून आणखी एकाचा मृत्यु
By पंकज पाटील | Updated: May 24, 2023 18:06 IST2023-05-24T18:06:04+5:302023-05-24T18:06:16+5:30
नेहा व अखिल यांना सुखरूप पाण्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचवण्यात सिद्धेशला यश आले.

बदलापूर बदलापूरच्या बारवी नदीत बुडून आणखी एकाचा मृत्यु
बदलापूर: बदलापूर जवळच्या आस्नोली येथे बारवी नदीत बुडून आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. प्रतिक पांडे (२३) असे या तरुणाचे नाव असून तो कल्याणच्या चक्की नाका परिसरात राहत होता. मंगळवारी संध्याकाळी ६ वा च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. प्रतिक त्याच्या ८ मित्र मैत्रिणींसह संध्याकाळी ४.३० वा च्या सुमारास आस्नोली येथील बारवी नदीवर आला होता. ते सर्वजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने प्रतिकसह नेहा तिवारी व अखिल शुक्ला हे बुडू लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून याठिकाणी आलेल्या सिद्धेश पाटील या डोंबिवलीच्या वीस वर्षीय तरुणाने पाण्यात उडी घेतली.
नेहा व अखिल यांना सुखरूप पाण्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचवण्यात सिद्धेशला यश आले. प्रतिक,नेहा व अखिल यांना पाण्याबाहेर काढून बदलापूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रतिकला तपासून मृत घोषित केले. तर नेहा तिवारी हिला उपचारार्थ उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात असून ती सुखरूप आहे. दरम्यान, याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी दिली. सुमारे आठवड्याभरापूर्वी याच नदीत बुडून बदलापुरात राहणाऱ्या सिद्धेश सावंत (१८) व बाळकृष्ण केदारे (३६) अशा दोघांचा मृत्यु झाला होता.