पावसाळाच्या सुरुवातीलाच भिवंडीतील मानकोली चिंचोटी रस्त्याची दुरवस्था; नागरिकांना त्रास
By नितीन पंडित | Updated: June 13, 2024 13:07 IST2024-06-13T13:07:00+5:302024-06-13T13:07:21+5:30
रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुरते दुर्लक्ष

पावसाळाच्या सुरुवातीलाच भिवंडीतील मानकोली चिंचोटी रस्त्याची दुरवस्था; नागरिकांना त्रास
नितिन पंडीत, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: येथील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी या रस्त्याची पावसाच्या सुरुवातीलाच प्रचंड दुरवस्था झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर प्रचंड खड्डे पडतात. मात्र या वर्षी अजून पावसाने दमदार हजेरी लावली नाही तोच या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे.
मागील अनेक वर्षांपासून पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडण्याचा इतिहास आहे. त्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाल्याने आधीच्या टोल वसूल करणाऱ्या कंपनीने व टोल बंद झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर थातूरमातूर पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती केली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावर अनेक अपघात होत असून अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
या रस्त्यावर मानकोली नाका, अंजुरफाटा, बहात्तर गाळा ते महेश कॉरी, वडघर खारबाव व खारबावच्या पुढे चिंचोटी पर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.