गीतांजली एक्स्प्रेसमध्ये घेतला बाळाने जन्म! कसाऱ्याजवळील घटना : महिला सहप्रवाशांनी केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 07:46 IST2021-05-28T07:46:41+5:302021-05-28T07:46:45+5:30
Baby born in Gitanjali Express: गीतांजली एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी सकाळी एका महिलेने बाळाला जन्म दिला.

गीतांजली एक्स्प्रेसमध्ये घेतला बाळाने जन्म! कसाऱ्याजवळील घटना : महिला सहप्रवाशांनी केली मदत
कसारा : गीतांजली एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी सकाळी एका महिलेने बाळाला जन्म दिला. गोरेगाव येथे राहणारा राजाबाबू दास हा पत्नी रुमा हिच्याबरोबर कोलकत्ता येथे जाण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बसला. गीतांजलीने कल्याण स्थानक सोडल्यावर कसाराकडे येत असताना उबंरमाळी ते कसारा स्थानकादरम्यान रुमा यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. डब्यातील महिला सहप्रवासी मदत करत होते. कसारा स्थानक येताच राजाबाबू याने रेल्वे पोलिसांकडे मदत मागितली असता त्यांनी तातडीने डब्यात धाव घेतली; पण तोवर महिलेची प्रसूती झाली होती.
रेल्वे पोलीस कर्मचारी अतुल येवले, पूनम हाबळे, रेल्वे सुरक्षा दलाच्या स्वाती मेश्राम यांनी तात्काळ रुमा यांना डब्यातून सुखरूप खाली उतरवले.
महिलेच्या मदतीसाठी देऊळवाडी येथील अंजना डोंगरे, भागीरथी भगत, कविता डोंगरे, मोहिनी भगत, पार्वती डोंगरे या महिलांनी तात्काळ कसारा रेल्वे स्थानकात धाव घेतली. रेल्वे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका खासगी गाडीतून महिला व बाळाला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी देवेंद्र वाळुंज यांनी महिलेवर तात्काळ उपचार सुरू केले. माता व बाळ यांची प्राथमिक तपासणी व उपचार करून त्यांना डिसार्ज दिला.
प्रसंगावधान राखत रेल्वे पोलिसांनी स्थानिक महिलांची मदत घेऊन प्रसूत महिलेची व बाळाची सुखरूप सुटका करून तिला पुढील वैद्यकीय उपचारासाठी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
- वाल्मीक शार्दूल, पोलीस निरीक्षक, कल्याण लोहमार्ग
महिलेची व बाळाची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर प्रसूतीनंतरचे सर्व उपचार करण्यात आले.
- देवेंद्र वाळुंज, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र, कसारा