भातसानगर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून संरक्षण तसेच पर्यावरणाच्या रक्षणाबाबत शहापूर येथील पर्यावरणवादी सामाजिक संस्था आणि वनविभागातर्फे शहापूर तालुक्यातील वासिंद, शहापूर, खर्डी, अघई येथे रस्त्यावर जनजागृती अभियान राबवण्यात आले.
वन वचवा, बेकायदा वृक्षतोड तसेच शिकार करणे थांबवा, त्याचबरोबर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा, कापडी मास्क दररोज धुऊन वापरावा, मास्क फेकून न देता तो जाळून टाकावा, इतरत्र मास्क फेकल्यास जनावरे, पक्षी यांना त्याचा अपाय होऊ शकतो, म्हणून मास्कची विल्हेवाट योग्यरीतीने लावावी, आदी महत्त्व या वेळी नागरिकांना पटवून देण्यात आले.
या वेळी जनजागृती पर्यावरणवादी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र गोतरने, सचिव ज्योती गोतरने, वन परिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी, रेश्मा थले, प्रमोद जाधव, आशिष हेलोडे, गणेश वाघमारे, बाळा कोठेकर, सदानंद म्हात्रे, अमोघ वैद्य, बालकृष्ण कोठेकर, कैलास धानके, भालचंद्र भेरे, अमजद शेख, दिव्यानी गोतरने यांना या वेळी वन विभागाकडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
-----------------