ठाण्याच्या वसंत विहारमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:13 IST2019-03-19T22:06:51+5:302019-03-19T22:13:25+5:30
सोमवारी भल्या पहाटेच्या सुमारास ठाण्याच्या वसंतविहार मधील एका एटीएम केंद्रामध्ये शिरुन एटीएमचे मशिन फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न १८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चोरटयाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे : वसंतविहार भागातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम केंद्राचे सुरक्षा लॉक तोडून मशिनमधील रोकड चोरण्याचा प्रयत्न सोमवारी पहाटेच्या दरम्यान झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या वसंतविहार येथील एटीएम केंद्रात एका चोरट्यांने १७ मार्च रोजी रात्री ८ ते १८ मार्च रोजी सकाळी ८ वा. च्या दरम्यान शिरकाव करून मशिन क्रमांक एस १ एनबी च्या समोरील पॅनलचे स्क्रू काढून, पॅनल उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मशिनचे सुरक्षा लॉक आणि स्लीप प्रिंटर तोडून मशिनमधील रोकड चोरण्याचा प्रयत्न झाला. परंतु, बराच प्रयत्न करूनही त्याला हे लॉक तोडता आले नाही. अखेर कसली तरी चाहूल लागल्यानंतर तो तिथून पसार झाला. पहाटे २.४५ वा. च्या सुमारास एक चोरटा एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बँकेचे मुख्य प्रबंधक रिजवान अन्सारी यांनी १८ मार्च रोजी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आर. सी. घनवट हे अधिक तपास करीत आहेत.