दिवाळी सणासाठी एटीएममधील रोकड चोरीचा प्रयत्न: दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 00:18 IST2020-11-18T23:50:46+5:302020-11-19T00:18:38+5:30
दिवाळी सणासाठी चक्क एटीएम मशीन फोडून रोकड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरज बाथडे (२१) आणि प्रकाश भिकू गांगुर्डे (२४) या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. रोकड चोरता न आल्याने त्यांनी पलायन केले होते. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे हे दोघेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

रोकड चोरता न आल्याने केले होते पलायन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लॉकडाऊनमुळे आलेल्या बेरोजगारीमुळे दिवाळीचा सण कसा साजरा करायचा या विवंचनेत असलेल्या दोघांनी चक्क एटीएम केंद्रच फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मशीनमधून त्यांना रोकड चोरता न आल्यामुळे त्यांनी एटीएमची तोडफोड करून पोबारा केला होता. वर्तकनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सुरज बाथडे (२१) आणि प्रकाश भिकू गांगुर्डे (२४) या दोघांनाही नुकतीच अटक केली आहे.
हे दोघेही लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील रहिवाशी आहेत. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यामुळे ते बेरोजगार झाले होते. त्यातच दिवाळीचा सण तोंडावर होता. यातूनच एटीएम फोडण्याचा विचार आल्याने ९ नोव्हेंबर रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी सावरकरनगर, पाचपाखाडी येथील एका राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. बराच प्रयत्न करूनही त्यांना एटीएमच्या मशिनमधून रोकड काढता आली नाही. त्यामुळे सूरज आणि प्रकाश या दोघांनी या एटीएम मशिनचे नुकसान करून तिथून पलायन केले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात १० नोव्हेंबर रोजी बँकेने तक्र ार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोकमान्यनगर भागातून सूरज याच्यासह दोघांनाही अटक केली. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी पैशांची निकड असल्यामुळे चोरीचा प्रयत्न केल्याची कबूली या दोघांनी दिल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.