इफेड्रिन ड्रग्स प्रकरणातील आरोपींचा न्यायालयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 15:06 IST2017-08-22T15:04:59+5:302017-08-22T15:06:16+5:30
जामिनासाठी प्रयत्नात असलेल्या इफेड्रिन प्रकरणातील आरोपींनी न्यायव्यवस्थेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. उच्च न्यायालयात दस्तुरखुद्द न्यायाधीशांनी यावर नाराजी व्यक्त केली.

इफेड्रिन ड्रग्स प्रकरणातील आरोपींचा न्यायालयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न
ठाणे, दि. 22 - जामिनासाठी प्रयत्नात असलेल्या इफेड्रिन प्रकरणातील आरोपींनी न्यायव्यवस्थेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. उच्च न्यायालयात दस्तुरखुद्द न्यायाधीशांनी यावर नाराजी व्यक्त केली. इफेड्रिन या अंमली पदार्थाच्या तस्करीचे प्रकरण ठाणे पोलिसांनी गतवर्षी उघडकीस आणले होते. सोलापूर येथील अॅव्हॉन फार्मा सायन्सेस या कंपनीतील सुमारे २ हजार कोटीचा इफेड्रिनचा साठा पोलिसांनी जप्त केला होता. अभिनेत्री ममता कुळकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी हादेखील या प्रकरणात आरोपी आहे. अॅव्हान फार्माचे संचालक मनोज जैन, निर्मिती व्यवस्थापक राजेंद्र दिमारी आणि वाहतूकदार बाबा धोत्रे हेदेखील या प्रकरणात आरोपी असून, त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयासमोर सुनावणी झाली. आरोपी मनोज जैनच्या नातलगांनी आपणास भेटण्याचा प्रयत्न केला. जामिनाच्या सुनावणीवर प्रभाव टाकण्याचा हा प्रकार असल्याचे निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवून यावर नाराजीही व्यक्त केली. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने विशेष सरकारी वकील शिषिर हिरे यावेळी न्यायालयात होते.