छटपूजेला चाललेल्या कुटुंबावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 03:07 IST2019-11-04T03:07:20+5:302019-11-04T03:07:57+5:30
तिघे जखमी : घरातील वस्तूंची नासधूस

छटपूजेला चाललेल्या कुटुंबावर हल्ला
ठाणे : छटपूजेसाठी पहाटे चाललेल्या जितेंद्र माली (३१) यांच्या कुटुंबावर लाकडी दांडक्याने हल्ला करून, त्यांच्यासह त्यांची पत्नी व मेहुणी यांना मारहाण करत सागर दळवी याने जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देत घरातील वस्तूंची नासधूस केल्याची घटना सावरकरनगर परिसरात घडली. दळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली नसल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.
सावरकरनगर येथील कृष्ण वृंदावन सोसायटीतील रहिवासी माली हे मूळ बिहारचे आहेत. तसेच ते पत्नी नेहा, मुलगी नव्या आणि मुलगा ऋषभ यांच्यासह मागील सहा वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहत आहेत. त्या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर राहणारा सागर दळवी हा मागील तीनचार दिवसांपासून येताजाता विनाकारण त्यांना शिवीगाळ करीत होता. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने माली कुुटुंबाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
३ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास छटपूजेच्या निमित्ताने माली हे पत्नी नेहा, मेहुणी प्रमिला आणि दोन मुलांसह उपवन तलाव येथे जाण्याकरिता तयारी करत होते. त्यावेळी दळवी हा नशेत आला व त्याने आईबहिणीवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. माली यांनी त्याला शिवीगाळ करू नको, असे सांगून दरवाजा बंद केला. त्यानंतर दळवीने दरवाजावरील असलेल्या मोकळ्या जागेतून घरात विटा फेकल्या. तसेच जोरात लाथ मारून घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
त्याच्याकडील लाकडी दांडक्याने जितेंद्र यांच्या डोक्यावर, पाठीवर व उजव्या हातावर मारहाण केली. त्यावेळी त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या पत्नी व मेहुणी यांनाही त्याने दांडक्याने मारहाण केली. यामध्ये पत्नी नेहा हिच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे तर, मेहुणी प्रमिला हिच्या डोक्याला व पायाला दुखापती झाली असून डावा हात फ्रॅक्चर झाला आहे.