‘गायमुख’ विकासासाठी आणखी ३० कोटी
By Admin | Updated: November 9, 2016 03:43 IST2016-11-09T03:43:26+5:302016-11-09T03:43:26+5:30
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने गायमुख परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येत असून

‘गायमुख’ विकासासाठी आणखी ३० कोटी
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने गायमुख परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येत असून, त्या कामाची मंगळवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी संयुक्तपणे पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी हा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच त्यासाठी आवश्यक ती वाढीव आर्थिक तरतूद करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार आता यासाठी सुमारे ३० कोटींचा वाढीव निधी देण्याचे पालिकेने मान्य केले असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
यासाठी फेब्रुवारीच्या अखेरीस महापालिकेने १३.८ कोटींचा निधी मंजूर केला असून, जर या चौपाटीचे आधुनिकीकरणाच्या माध्यमातून सुशोभीकरण करावयाचे असेल तर अतिरिक्त पैशांची आवश्यकता असल्याचे मत मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता मिलिंद वाणी यांनी पालिका आयुक्त आणि आमदारांच्या निदर्शनास आणले. या खाडीच्या सुशोभीकरणासाठी तसेच भविष्यात या जेट्टीवरून मिरा भार्इंदर, कल्याण डोंबिवली, भिवंडी, वसई, विरार या शहरात रो रो बोट सेवा अथवा जलवाहतूक, त्याचबरोबर इतर साहसी क्रीडा खेळ व चौपाटीचे सुशोभीकरण करावयाचे असल्यास ५२ कोटींचा वाढीव खर्च येणार असल्याची माहिती डिझायनर अरुण कुमार यांनी दिली. त्यावर आयुक्तांनी हे काम समाधानकारक सुरू असून, जर आधुनिक पद्धतीने सुशोभीकरण करायचे झाल्यास त्यासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात ५ कोटी, व २०१७-१८ या आर्थिक वर्षात २५ कोटी वाढीव निधी देण्याचे मान्य केल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मोगरपाडा तलाव आणि कासारवडवली येथील दोन तलावही तात्काळ सुशोभित करण्याचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.