ठाण्यातील महापौर बंगल्यात आनंद दिघे यांचे स्मारक? रेमंडच्या जागेत उभा राहणार नवा महापौर बंगला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 06:01 IST2025-08-24T06:01:08+5:302025-08-24T06:01:45+5:30
Anand Dighe's Memorial News: ठाण्यातील उपवन येथील महापौर बंगल्यात शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे स्मारक उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उपवन तलाव परिसरात असलेला महापौर बंगला आता आपली जागा बदलणार आहे.

ठाण्यातील महापौर बंगल्यात आनंद दिघे यांचे स्मारक? रेमंडच्या जागेत उभा राहणार नवा महापौर बंगला
ठाणे : ठाण्यातील उपवन येथील महापौर बंगल्यात शिवसेनाठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे स्मारक उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उपवन तलाव परिसरात असलेला महापौर बंगला आता आपली जागा बदलणार आहे. गेले अनेक वर्षे राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेला महापौर बंगला इतिहासजमा होणार आहे. कारण, नव्या विकास आराखड्यात हा बंगला आता रेमंडच्या जागेवर प्रस्तावित केला आहे.
उपवन तलाव परिसरात ठाणे महापौर बंगला आहे. गेली अनेक वर्षे राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेला महापौर बंगला इतिहासजमा होणार असून, नव्या विकास आराखड्यात हा बंगला आता रेमंडच्या जागेवर प्रस्तावित करण्यात आला आहे. रेमंड संकुलामध्ये ठाणे महापालिका भवन इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असल्याने, त्याच्यालगत २,६१० चौ. मी. क्षेत्रफळाचा सुविधा भूखंड प्राप्त झाला आहे.
स्थलांतर का?
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी २०२४-२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पात उपवन तलाव परिसरातील ठाणे महापौर बंगल्यात आनंद दिघे यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. यासाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यामुळेच आता महापौर बंगला हा रेमंड येथे हलविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.