फसवणूक करून मिळविलेले ५८ लाख रुपये मोडक्या झोपडीत राहणाऱ्या कातकरी वृद्धेने केले शासनास परत?
By नितीन पंडित | Updated: November 15, 2022 19:19 IST2022-11-15T19:19:16+5:302022-11-15T19:19:47+5:30
कातकरी महिलेची फसवणूक करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची श्रमजीवीची मागणी.

फसवणूक करून मिळविलेले ५८ लाख रुपये मोडक्या झोपडीत राहणाऱ्या कातकरी वृद्धेने केले शासनास परत?
भिवंडी : मुंबई वडोदरा महामार्गामध्ये बाधित शेतजमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी मयत आदिवासी कातकरी महिलेच्या जागी दुसऱ्या कातकरी वृद्ध महिलेस उभे करून शासनाची फसवणूक करून संगनमताने लाटलेला ५८ लाख रुपयांचा मोबदला वृद्ध कातकरी महिला भागीरथी मुकणे हिने शासनाच्या बँक खात्यात जमा केला आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या बँक खात्यात अवघे १६७९ रुपये शिल्लक असताना, तिचे दारिद्र्य पाहता एवढी भली मोठी रक्कम तिच्या नावे शासनास कोणी परत केली हा प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली असून त्याविरोधात प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे भागीरथी मुकणे ही वयोवृध्द अशिक्षित कातकरी महिला असून तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्यांनी हा गुन्हा केला असताना उपविभागीय अधिकारी कार्यालयाने भागीरथी मुकणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र संबंधित पोलीस यंत्रणेला दिले आहे. एक आदिवासी अशिक्षित महिला एवढ्या मोठ्या रक्कमेचा अपहार करु शकत नाही असे मत व्यक्त करीत आदिवासी वयोवृद्ध महिला भागीरथी रामा मुकणे या महिलेवर फक्त गुन्हा दाखल न करता यामध्ये जे अधिकारी, कर्मचारी व दलाल सहभागी आहेत त्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा एका आदिवासी अशिक्षित वयोवृद्ध महिलेवर गुन्हा दाखल करून तिच्यावर जाणूनबुजून अन्याय करीत असल्याच्या विरोधात श्रमजीवी संघटनेने केला आहे.
शासनाची फसवणूक करून पैसे लाटल्याचे समजताच भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने पैसे वसूल करण्यासाठी नोटीस बजावून कार्यवाही सुरू केली आहे, तर या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे लेखी पत्र गणेशपुरी पोलीस ठाणे यांना दिले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली असून ९ नोव्हेंबर रोजी फसवणूक करून लाटलेली सर्व ५८ लाख ४२ हजार ९९६ रुपये शासनाच्या बँक खात्यात जमा झाले असल्याने व तसे पत्र भागीरथी मुकणे यांनी कार्यालयात जमा केले आहे. ही फसवणूक कोणी व कशा पद्धतीने केली हा संपूर्ण पोलीस तपासाचा भाग असून शासन कोणालाही पाठीशी घालणार नसल्याची भूमिका उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी मांडली आहे.
दुसरीकडे भागीरथी मुकणे ही दुगाड गावातील अशिक्षित वृद्ध कातकरी महिला असून या संपूर्ण प्रकरणात तिचा वापर करून हे पैसे लुबाडल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी धाब्यावर जेवणावळी झोडण्यासाठी, कारमध्ये पेट्रोल व सोने खरेदी करण्या सोबत लाखो रुपये रोख स्वरूपात एटीएम मधून काढण्यात आले आहेत,परंतु अशिक्षित भागीरथी मुकणे यांना अक्षरज्ञान नसताना त्यांच्या खात्यातून एवढी रक्कम कोण काढत होते, ते पैसे कोण खर्च करीत होता व ते पैसे पुन्हा शासनाच्या बँक खात्यात कोणी जमा केले याचा शोध घेण्याची गरज असून पोलीस व उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाबत निपक्षपाती चौकशी करून खऱ्या गुन्हेगारा पर्यंत पोहचणार का हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. दरम्यान गणेशपुरी पोलिसांनी गुन्हा आपल्या कार्यक्षेत्रात घडला नसल्याने गुन्हा नोंदविण्यास नकार दिला असल्याचीही खात्रीलायक माहिती मिळत आहे.