उल्हासनगरात अमृत योजनेचा कामाचा उडाला धुराळा, महापौरांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:56 IST2026-02-06T12:55:37+5:302026-02-06T12:56:19+5:30
कोट्यवधींचे रस्ते पुन्हा खोदले; उल्हासनगरकरांचे आरोग्य धोक्यात, प्रशासकीय नियोजनाचा अभाव चव्हाट्यावर

उल्हासनगरात अमृत योजनेचा कामाचा उडाला धुराळा, महापौरांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती
सदानंद नाईक
उल्हासनगर: शहरात 'अमृत' योजनेअंतर्गत भुयारी गटारीचे पाईप टाकण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामाने नागरीकांचे जगणे मुश्कील झाले आहे. नियोजनाच्या अभावामुळे वर्षभरापूर्वीच तयार केलेले कोट्यवधींचे रस्ते पुन्हा खोदले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. या सर्व गोंधळामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरले असून, गुरुवारी महापौर अश्विनी निकम यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
उल्हासनगरात ४५० कोटींच्या अमृत योजने अंतर्गत गटारी पाईप टाकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदले जात आहेत. विशेष म्हणजे, महानगरपालिका निवडणुकीपूर्वी कोट्यवधींचा निधी खर्च करून जे रस्ते गुळगुळीत करण्यात आले होते, तेच रस्ते आता पुन्हा खोदून काढले जात आहेत. यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची टीका नागरिक करीत आहेत. खोदकाम करताना संबंधित ठेकेदाराकडून पाणी मारणे किंवा धूळ रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. यामुळे संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
गटारीचे पाईप टाकण्यासाठी रस्ते खोदल्याने, सर्वत्र धूळ पसरली आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास आणि डोळ्यांचे विकार जडत आहेत. तसेच अर्धवट रस्त्यांमुळे कल्याण-अंबरनाथ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
६८ कोटींच्या कल्याण-अंबरनाथ रस्ता पुनरबांधणीचे काम संथगतीने
महापौरांनी गुरुवारी रस्त्याना भेटी देत बांधकाम अधिकाऱ्यांची हजेरी घेत वाढत्या तक्रारींची दखल घेत महापौर अश्विनी निकम यांनी गुरुवारी अंतर्गत रस्ते आणि मुख्य रस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहर अभियंता निलेश शिरसाटे, उपअभियंता संदीप जाधव आणि राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांना घटनास्थळी बोलावून त्यांची हजेरी घेतली.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि धुळीने नागरिक त्रस्त
महापालिका अधिकाऱ्यांचे ठेकेदारावर अंकुश का नाही?" असा सवाल करत महापौरांनी तातडीने रस्ते दुरुस्तीचे आणि धूळ कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे कडक आदेश दिले आहेत. महापौरांनी प्रशासनाने दिलेले आदेश कागदावरच राहतात की प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन नागरिकांना दिलासा मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.