अल्युफिन कंपनी स्फोट प्रकरण : कंपनी मालक आणि सुपरवायझरवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 16:44 IST2017-11-21T16:44:27+5:302017-11-21T16:44:43+5:30
येथील एमआयडीसी फेज 2 मधील अल्युफिन कंपनीत सोमवारी झालेल्या कॉम्प्रेसर स्फोटाप्रकरणी कंपनीचे मालक निलय अजित घोलकर आणि सुपरवायझर जोखम हरीहर राय व अन्य व्यक्तींविरोधात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा मानपाडा पोलिसांनी दाखल केला आहे.

अल्युफिन कंपनी स्फोट प्रकरण : कंपनी मालक आणि सुपरवायझरवर गुन्हा दाखल
डोंबिवली: येथील एमआयडीसी फेज 2 मधील अल्युफिन कंपनीत सोमवारी झालेल्या कॉम्प्रेसर स्फोटाप्रकरणी कंपनीचे मालक निलय अजित घोलकर आणि सुपरवायझर जोखम हरीहर राय व अन्य व्यक्तींविरोधात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा मानपाडा पोलिसांनी दाखल केला आहे.
दरम्यान, या स्फोटाच्या घटनेत गंभीर जखमी झालेले कामगार राजेंद्र यशवंत जावळे यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होत झाल्याची माहीती एम्स रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली,
सोमवारी सकाळी साडेआठ ते पावणोनऊच्या दरम्यान अल्युफिन कंपनीत कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन कंपनीमधील दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली. यात कमरेपासून डावा पाय पुर्णत: निखळल्याने गंभीर जखमी झालेल्या जावळे यांना तातडीने नजीकच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रारंभी त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली परंतू आता त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याची माहीती तेथील डॉ तनुजा गायकवाड यांनी दिली. जावळे यांचा डावा पाय पुर्णपणो या स्फोटात तुटला पण त्यांच्या उजव्या पायावर देखील तीन ठिकाणी फ्रॅर आहे त्यामुळे त्याठिकाणी देखील शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या घटनेत उडालेला कॉम्प्रेसरचा अवशेष रस्त्यावरून जाणा-या मोटारसायकलवर आदळला होता. त्यामुळे या गाडीवरील हुसेन मुजावर आणि सतीश पाटील हे दोघेही किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कंपनीवर निष्काळजी, हलगर्जीपणाचा गुन्हा
स्फोटाच्या घटनेप्रकरणी कंपनी मालकासह सुपरवायझर आणि इतर संबंधित व्यक्तींवर हलगर्जी आणि निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एअर कॉम्प्रेसरची योग्य प्रकारे निगा न राखल्याने हा स्फोट झाल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. तसेच सुरक्षतेच्या बाबतीत कोणत्याही उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी महिला पोलिस उपनिरिक्षक पुनम जाधव यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.